scorecardresearch

शरीर थकलं, आवाज थरथरत होता; तरीही रतन टाटांनी घेतला ‘हा’ निर्णय…

उद्योगपती रतन टाटा यांनी करोना साथीच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली होती.

उद्योगपती रतन टाटा यांनी करोना साथीच्या पहिल्या लाटेत पीएम केअर फंडमध्ये सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली होती. देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांनी आता आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा केली आहे. आसाममधील डिब्रूगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात रतन टाटांनी ही घोषणा केली. सुरुवातील इंग्रजीतून आणि नंतर हिंदीतून केलेल्या भाषणात त्यांनी म्हटलं की, “मी माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आसाममधील डिब्रूगड जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन केलं. हे कर्करोग उपचार केंद्र आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन (ACCF), टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकारच्या संयुक्त विद्यमाने बांधलं आहे. यावेळी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करत आहे.” यावेळी त्यांचं शरीर थकलेलं दिसलं. बोलताना त्यांचा आवाज देखील थरथरत होता. अशा स्थितीतही त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रतन टाटा पुढे म्हणाले की, आसाममध्ये १७ कॅन्सर उपचार केंद्रांचं नेटवर्क तयार करण्यात येत आहे. या रुग्णालयांमधून केवळ आसामच नव्हे तर देशभरातील सर्वच रुग्णांना सुलभ उपचार मिळेल. कारण कर्करोग हा केवळ श्रीमंतांचा आजार नाही. अत्याधुनिक सुविधांमुळे आसाम जागतिक दर्जाचं कर्करोग उपचार देणारं सक्षम राज्य म्हणून ओळखलं जाईल. आसामच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं. राज्यात यापूर्वी उपलब्ध नसलेल्या कर्करोगावरील अनेक उच्चस्तरीय आरोग्य सुविधा येथे आणण्यात येत आहे.

यामुळे केवळ आसामच नव्हे तर देशभरातील जवळपास ५० हजार कर्करोगग्रस्त रुग्णांना दरवर्षी जीवदान मिळणार आहे. कर्करोगावर उपचार करणारं टाटा समूहाचं हे देशातील सर्वात मोठं जाळं असणार आहे. यातील सात कर्करोग उपचार केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ratan tata dedicate his last years to health made statement while inaugurating seven cancer centres in assam rmm

ताज्या बातम्या