नवी दिल्ली :आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधीच्या (पीएम केअर्स फंड) विश्वस्तपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवनियुक्त विश्वस्त मंडळासह बैठक घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी या निधीत भरघोस मदत दिल्याबद्दल देशवासीयांना धन्यवाद दिले. पंतप्रधान कार्यालयातर्फे बुधवारी प्रसृत केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.

या बैठकीत भारताचे माजी नियंत्रक व महालेखापाल राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडी कॉर्प आणि पिरामल फाउंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांना ‘पीएम केअर्स फंड’च्या सल्लागार मंडळात नियुक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हेही उपस्थित होते.

बैठकीत करोनामुळे आपले आई-वडील गमावलेल्या चार हजार ३४५ मुलांना मदत करण्यासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ या उपक्रमासह ‘पीएम केअर’द्वारे घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सादरीकरण करण्यात आले. कोविड काळात या ‘पीएम केअर’ने बजावलेल्या भूमिकेचे विश्वस्तांनी गौरवोद्गार काढले. पंतप्रधानांनी ‘पीएम केअर’मध्ये दिलेल्या उदार योगदानाबद्दल देशवासीयांची प्रशंसा केली. या वेळी झालेल्या चर्चेत ‘पीएम केअर’ची आपत्कालीन, संकट परिस्थितीत साहाय्याचीच नव्हे तर आणीबाणी, संकटाला प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. नवीन विश्वस्त व सल्लागारांच्या सहभागामुळे ‘पीएम केअर’ निधीच्या कामकाजास सर्वसमावेशक दृष्टिकोन लाभेल. या मान्यवरांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ सार्वजनिक गरजा भागवताना निश्चित होईल. त्यामुळे उत्तरदायित्व वाढेल व संकट निर्मूलनासाठी प्रभावी प्रतिसाद देता येईल.

दहा हजार कोटींपेक्षा जास्त निधी

२०१९-२० या वर्षांत या निधीमध्ये तीन हजार ९७६ कोटी रुपये जमा झाले होते. त्यात २०२०-२१ मध्ये वाढ होऊन दहा हजार ९९० कोटी रुपये जमा झाले. या निधीतून एक हजार कोटी स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी खर्च करण्यात आले. एक हजार ३९२ कोटींची मदत करोनाप्रतिबंधक लसनिर्मितीसाठी देण्यात आली. ‘पीएम केअर’ निधीतून देशातील सर्व जिल्ह्यांत प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. ‘पीएम केअर’ स्थापण्यात आल्यानंतर मोठय़ा संख्येने नागरिक, संस्था आणि सरकारी संस्थांनीही यात भरीव योगदान दिले आहे.