Rats ate Seized Ganja : झारखंडमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. झारखंड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी एक मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी एका वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आरोपींसह वाहन आणि संबंधित अंमली पदार्थ जप्त करत कारवाई केली होती.

त्यानंतर आता २०२४ मध्ये जेव्हा या प्रकरणी खटल्याच्या सुनावणीवेळी हे पदार्थ (पुरावा) न्यायालयात सादर करण्याची वेळ आली तेव्हा पोलिसांनी केलेला दावा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी न्यायालयात दावा केला की, कारवाई केल्यानंतर जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ (गांजा) गोदामात साठवून ठेवण्यात आला होता. मात्र, तो गांजा आता उंदरांनी खाल्ला आहे.

पोलिसांनी केलेला दावा ऐकल्यानंतर या प्रकरणातील आरोपीला रांची येथील विशेष एनडीपीएस न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. कारण या प्रकरणात न्यायालयाने तपासात अनेक त्रुटी अधोरेखित केल्या. तसेच पोलिसांना न्यायालयासमोर पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

दरम्यान, फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, रांची जिल्ह्यातील ओरमांझी पोलिसांनी १७ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय महामार्ग-२० वर एका पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडीवर कारवाई करण्यात आली असता अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचं आढळून आलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गाडी थांबवल्यानंतर त्या गाडीमधून तिघे जण उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील इंद्रजित याला अटक करण्यात आली होती, तर आणखी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तेव्हा पोलिसांनी गाडीची झडती घेतली आणि डब्यांमध्ये लपवून ठेवलेला सुमारे १७० पॅकेटमध्ये पॅक केलेला २०० किलो गांजा सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता.