गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत होता. गुरुवारी सर्व पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारसभा थंडावल्या. आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या टप्प्यातील मतदानाच्या ३६ तास आधी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता लागू झाली आणि देशभरातील लोकसभेचा प्रचार थांबला. यंदाची लोकसभा निवडणूक तब्बल सात टप्पे चालली. या सात टप्प्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २०६ प्रचारसभा घेतल्या. तसेच ८० हून अधिक मुलाखती देखील दिल्या. प्रचारसभांचं द्विशतक झळकावल्यानंतर पंतप्रधान मोदी ध्यान करू लागले आहेत. मोदी यांनी यांचे ध्यानधारणा करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोदी हे कॅमेऱ्यासमोर बसून ध्यानधारणा करत असल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. अशातच भाजपाचे गोरखपूर लोकसभेचे उमेदवार आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन हे मोदींच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह एकूण आठ राज्यांमध्ये आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागातील मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे. दरम्यान, गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजपा खासदार रवी किशन यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेबाबत मोठं वक्तव्य केलं.

हे ही वाचा >> प. बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचार, जमावाने EVM, VVPAT मशीन तलावात फेकल्या; जाधवपुरात बॉम्बहल्ला

रवी किशन म्हणाले, आज हवामान खूप चांगलं आहे. तिकडे (कन्याकुमारी) पंतप्रधान मोदी ध्यानधारणा करायला बसले आणि सूर्यदेव शांत झाले. मोदींनी त्यांच्या ध्यानधारणेतून सूर्यदेवतेला शांत केलं आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. इतके दिवस भीषण उन्हाळा असताना आज गार वारा सुटलाय. हा रामराज्याचा मोठा संकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराट रुपात येतील. ज्यामुळे माझा भारत विराट, विकसित आणि सोन्याची चिमणी (सोने की चिड़िया) बनेल. हा भारत कोणासमोर झुकणार नाही. संपूर्ण जग या भारतासमोर नतमस्तक होईल, एक मबजूत भारत आता बनू लागला आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)