भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (बुधवार) २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी नेत्यांवर टीका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली आहे. रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत नितीश कुमार यांच्या विधानाची खिल्ली उडवली, ज्यात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या ५० जागा कमी होतील असे म्हटले होते. रविशंकर म्हणाले, ‘दिवसा स्वप्न पाहण्यास मनाई नाही.’

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गुन्हेगारीचा आलेख वाढल्याच्या प्रश्नावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, बिहारमध्ये भीतीचे राज्य आले आहे. आपण काहीही केले तरी पोलीस कारवाई करू शकणार नाहीत, याची आता गुन्हेगारांना खात्री झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’चा संदर्भ देत ते म्हणाले की, रॉबर्ट वाड्रा यांचाही या यात्रेशी संबंध आहे, हे हास्यास्पद आहे. राहुल गांधी स्वत:च्या पक्षालाच जोडू शकत नाहीत.

विशेष म्हणजे, नितीश कुमार यांनी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांची भेट घेतली. भाजपाशी संबंध तोडल्यानंतर नितीश कुमार हे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ते चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश यांनी काल डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी आणि डी. राजा यांचीही भेट घेतली होती.