सोशल मिडिया सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे कि, भारतीय रिझर्व्ह बँक ३० जून २०२६ पर्यंत सर्व कागदी नोटा चलनातून बाद करणार असून त्यांच्या जागी प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा आणणार आहे. मात्र, ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’च्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

फॅक्ट चेक काय सांगते?

पीआयबी (PIB) फॅक्ट चेकने ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या अफवांचे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँकेचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की, “३० जून २०२६ पर्यंत कागदी नोटा मागे घेण्याचा किंवा त्यांच्या जागी प्लास्टिक नोटा आणण्याचा आरबीआयचा कोणताही विचार नाही.” त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

व्हायरल व्हिडिओचे सत्य काय?

सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओमध्ये १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा दाखवल्या आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकू येत असून खाली हिंदीमध्ये कॅप्शन लिहिले आहे. पीआयबीने तपासणीअंती सांगितले की, हा व्हिडिओ ‘डिजिटल पद्धतीने बदललेला’ (Digitally Altered/Edited) आहे. मूळ व्हिडिओशी छेडछाड करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा खोटा दावा तयार करण्यात आला आहे.

प्लॅस्टिक नोटांची चर्चा का सुरू झाली?

काही काळापासून सोशल मीडियावर आणि काही अहवालांमध्ये असे म्हटले जात होते की, आरबीआय जास्त काळ टिकणाऱ्या आणि बनावट नोटांना आळा घालणाऱ्या ‘पॉलिमर’ (प्लास्टिक) नोटा आणण्याचा विचार करत आहे. अनेक युजर्सनी या संभाव्य निर्णयाचे स्वागतही केले होते. परंतु, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने असा कोणताही अधिकृत आदेश किंवा परिपत्रक जारी केलेले नाही. सध्या बाजारात असलेल्या कागदी नोटा नेहमीप्रमाणेच वैध राहतील.

नागरिकांना आवाहन

पीआयबीने जनतेला आवाहन केले आहे की, पैशांशी संबंधित किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांबद्दल माहिती हवी असल्यास केवळ रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरच विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील कोणत्याही अपुऱ्या आणि अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका आणि ती पुढे शेअर करणे टाळा. कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ती @PIBFactCheck कडे तक्रार म्हणून नोंदवावी.