३ मे रोजी झालेला NEET-UG चा पेपर फुटल्यामुळे आता २१ जून रोजी एनटीएकडून NEET-UG ची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. दरम्यान, या पुनर्परीक्षेचा पेपर फुटल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एनटीएने दखल घेतली आहे. व्हायरल पोस्ट ‘फेक’ असल्याचे एनटीएने ‘एक्स’वर सांगितले आहे. NEET-UG पुनर्परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याआधी पेपर पुन्हा फुटल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती पोस्ट खोटी (फेक) असल्याचे NEET-UG पेपर घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शुक्रवारी म्हटले आहे.
NTA ने म्हटले आहे की, NEET-UG पुनर्परीक्षेच्या तयारीचा सर्व स्तरांवर आढावा घेतला जातोय. “केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावर सहकार्य ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला अत्यंत सहज व सुरक्षितपणे परीक्षा देता यावी यावर भर दिला जात आहे”, असे NTA ने शुक्रवारी म्हटले.
नेमकं काय घडले?
NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका पुन्हा फुटल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यावर “हे खोटे आहे” (This is fake) असे प्रत्युत्तर NTA ने दिले. यापूर्वी ३ मे रोजी NEET-UG परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, परीक्षेआधीच पेपर फुटल्याचे NTA च्या निदर्शनात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. नीट पेपर फुटीविरोधात देशभरात विरोधकांनी व विद्यार्थ्यांनी आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २१ जून रोजी पुन्हा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सरकारने विद्यार्थ्यांना पेपरमध्ये माहिती भरण्यासाठी तसेच काही फॉर्मलिटी पूर्ण करण्यासाठी परीक्षेत अतिरिक्त १५ मिनिटांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
निष्पक्षपणे व व्यवस्थित पुनर्परीक्षा होणार – केंद्रीय शिक्षण मंत्री
NEET-UG ची पुनर्परीक्षा निष्पक्षपणे व व्यवस्थितपणे घेतली जाईल, असे आश्वासन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिले आहे. “NEET-UG च्या सर्व विद्यार्थ्यांनी विश्वास बाळगावा व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे मी आवाहन करतो. पुनर्परीक्षा निष्पक्षपणे व व्यवस्थितपणे घेतली जाईल”, असे प्रधान म्हणाले.
दरम्यान, पहिली परीक्षा रद्द झाल्यानंतर काही भागांतून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आले. पहिल्या परीक्षेत जशी कामगिरी केली तशी पुन्हा होणाऱ्या परीक्षेत करता येणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. नागपूर व कर्नाटकातील कलबुर्गी येथे NEET-UG च्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.
पेपरफुटीनंतरची कारवाई
NEET-UG परीक्षा पेपरफुटीचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या प्रकरणी सर्वाधिक आरोपींना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली. सीबीआयने म्हटले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. परीक्षेपूर्वी पेपर फुटण्याचा मुख्य स्त्रोत काय होता, याचा तपास केला जातोय. NTA मधील अधिकारी देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेपरफुटीची जबाबदारी मागील महिन्यात केंद्र सरकारने घेतली, व परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने तीव्र शब्दांत पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
