NEET UG results 2026 likely by July 20: देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या ‘नीट यूजी २०२६’ (NEET UG 2026) परीक्षेच्या निकालाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) नीट परीक्षेचा निकाल २० जुलैपर्यंत जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, निकाल जाहीर होण्यापूर्वीच एनटीएनं विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची अपडेट दिली असून, बँक खात्याचे तपशील अपडेट करण्यासाठी ७ जुलै रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
मे महिन्यात झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर, २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेला तब्बल २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. २५ जून रोजी या परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करून २८ जूनपर्यंत त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते. आता विद्यार्थी ओएमआर शीट आणि अंतिम निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
२० जुलैपर्यंत निकाल लागण्याची शक्यता
वृत्तसंस्था ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल २० जुलै २०२६ पर्यंत घोषित केला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे निकाल जाहीर करण्यासाठी एनटीएला ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, यंदा उद्भवलेली परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
…तर हक्काचे पैसे बुडणार! NTA कडून तातडीचे आवाहन
निकाल लागण्यापूर्वी एनटीएने विद्यार्थ्यांच्या फी रिफंडबाबत एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट केलेली नाही, त्यांना ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाची आकडेवारी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ ८,२९,५१० विद्यार्थ्यांनीच आपल्या बँक खात्याची अचूक माहिती पोर्टलवर अपडेट केली आहे. अजूनही मोठ्या संख्येने पात्र विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर मुदतीपूर्वी ही माहिती सबमिट केली नाही, तर विद्यार्थ्यांचा रिफंड अडकू शकतो किंवा हक्काचे पैसे बुडण्याची भीती आहे.
विद्यार्थ्यांनी फी रिफंडसाठी काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपले बँक तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांनी खालील प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी:
- सर्वात आधी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.
- बँक तपशील दुरुस्त किंवा अपडेट करण्याचा पर्याय निवडा आणि अचूक माहिती भरा.
- ७ जुलैच्या अंतिम मुदतीनंतर या प्रक्रियेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच बँक खात्याची माहिती अचूक भरली आहे, त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज रात्रीपर्यंत माहिती अपडेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पैसे पुढील टप्प्यात जमा केले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आपले बँक तपशील तपासून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
