मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांनी अनुसरलेल्या घराणेशाही आणि कुटुंबाभिमुख राजकारणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

“इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केलं आहे. याबाबतची माहिती पक्षातील एका व्यक्तीने दिली आहे.

हैदराबादमध्ये सुरू असलेली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पक्षाला मार्गदर्शन केलं. उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी “सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिमांसारख्या समुदायांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन पक्षाला केलं आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी देखील भाजपाने पसमांदा मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पसमांदा समाजाच्या मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याचं मूल्यांकन पक्षानं केलं आहे,” अशी माहिती कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका नेत्याने दिली. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यानंतर भाजपाने पसमांदा समुदायाचे नेते दानिश आझाद यांना योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील केलं आहे.