New Delhi Fake ED Raid Case: एखाद्या हिंदी सिनेमातील सस्पेन्स सीन शोभावा अशी धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने भावजयच्या मदतीने एका पॉश भागातील घरात चक्क ईडी (अंमलबजावणी संचालनालय) अधिकारी असल्याचे भासवत बनावट छापेमारी करुन हात साफ केला. पण, घरमालकाच्या नातवामुळे या प्रकरणात खरा ट्विस्ट आला. घरमालकाचा नातू ईडी वकील असल्याने या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला.
नणंद – भावजयचा प्लॅन
घरकाम करणारी रेखा देवी आणि तिची भावजय पूजा राजपूत यांनी हा सगळा कट रचला होता. छापेमारी यशस्वी करण्यासाठी त्यांनी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) कर्मचारी, लष्करातील निवृत्त जवान आणि एका पुरुष व्यक्तीची मदत घेतली होती. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली असून, इतर तिघेजण फरार आहेत.
फ्रेंड्स कॉलनीत छापेमारी
फ्रेंड्स कॉलनीत ८६ वर्षीय आर. सी. सभरवाल यांच्या घरात तीन पोलिस युनिफॉर्म घातलेल्या पुरुषांनी प्रवेश केला. ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी छापेमारी करण्यासाठी आल्याचे सांगितले. यावेळी या प्रकरणाची मास्टरमाईंड रेखा देवी देखील घटनास्थळी हजर होती, असे पोलिसांनी सांगितले. संशयितांनी घरात शोधाशोध सुरु केली.
कुटुंबीयांना खोलीत डांबून मोबाईल हिसकावले
संशयितांनी घरातील सदस्यांचे मोबाईल हिसकावले आणि त्यांना एका खोलीत बंद केले. यानंतर संशयितांनी घरात शोधाशोध सुरु केली. घरमालक उषा सभरवाल यांनी नातवला माहिती दिल्यानंतर या प्रकरणात खरा ट्विस्ट आला. सभरवाल यांचा नातू ईडीचा वकील आहे. अंमलबाजणी संचालनालयाच्या खऱ्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला त्यावेळी संशयितांची भंबेरी उडाली. घरातून काही रोकड आणि किंमती साहित्य घेऊन त्यांनी पळ काढला.
पोलिसांनाकडून तपास
सभरवाल यांनी १३ फेब्रुवारी रोजी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करून शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून तांत्रिक मदतीने संशयिताचा शोध सुरु केला. तपासाअंती या गुन्ह्यात वापर करण्यात आलेली चारचाकी ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने या प्रकरणातील मास्टरमाईंड रेखा देवी आणि तिला मदत करणारी पूजा राजपूत यांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील तीन संशयित अद्याप फरार आहेत.

