अहमदाबादमध्ये गुरुवारी १२ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स व दोन वैमानिक होते. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग ७८७ हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं. ६२५ फुटांवरून विमान थेट मेघानीनगर या निवासी परिसरात कोसळलं. या दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे अपघातामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात हवाई उड्डाण तज्ज्ञ अमोल यादव यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचं नेमकं कारण काय?

अमोल यादव यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अपघातामागील संभाव्य कारणांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार, इंजिनमध्ये पुरेशी पॉवर निर्माण होत नसल्यामुळे इंजिन फेल झाले आणि हा अपघात झाला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. “व्हिडीओमध्ये दिसतंय की टेकऑफ घेतल्यानंतर वर न जाता हे विमान खाली आलं. त्याचे विंग्ज लेव्हलमध्ये आहेत. विमानाचे लँडिंग गिअर्सही खालीच आहेत. ज्या प्रकारे हे विमान खाली जातंय ते पाहाता वैमानिकानं दोन वेळा विमानाचं नाक (पुढचं टोक) हवेत उचलण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ मला एवढाच कळतोय की इंजिनमध्ये पुरेशी पॉवर निर्माण होत नव्हती. त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे”, असं अमोल यादव म्हणाले.

“२०१४ साली हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालं आहे. तेव्हापासून या विमानानं अनेक उड्डाणं घेतली असणार”, असंही ते म्हणाले.

विमान खाली येत असताना काय झालं असेल?

“हे विमान अत्याधुनिक आहे. लँडिंग होताना धावपट्टीपासून किती उंची बाकी आहे त्याचीही माहिती ते वारंवार देत असतं. एखाद्या धावपट्टी नसलेल्या ठिकाणी विमान खाली यायला लागलं, तर त्या विमानातली ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग सिस्टीम अर्थात जीपीडब्ल्यूएस प्रणाली सुरू झाली असेल. वैमानिकाने त्या वेळी सर्व प्रकारचे संदेश दिले असणार. वैमानिकांनी टेकऑफ घेताना इंजिनची पूर्ण ताकद देऊन विमान वर नेण्याचा प्रयत्न केला असेल”, असं अमोल यादव म्हणाले.

“वैमानिकांनी शेवटपर्यंत विमान वाचवण्याचे प्रयत्न केले”

“इंजिन फेल झाल्यानंतर त्यांना हवेत एका मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळाला. पण त्यातही त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं दिसलं. त्यांनी शेवटी दोन वेळा पिचअप म्हणजेच विमानाचं नाक वर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. शेवटी विमानाचा वेगही कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यामुळे वैमानिकांना जे प्रशिक्षण दिलं जातं, त्याचा वापर करून शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. मी तो शेवटचा व्हिडीओ पाहून सांगू शकतो की शेवटच्या क्षणापर्यंत वैमानिकांनी ते विमान वाचवण्याचा प्रयत्न केला”, असं अमोल यादव यांनी नमूद केलं.

धावपट्टीवरच विमानात बिघाड निर्माण झाला? मग उड्डाण थांबवलं का नाही?

दरम्यान, विमान धावपट्टीवर असतानाच त्यात बिघाड झाला असावा, असा अंदाज अमोल यादव यांनी वर्तवला आहे. “सामान्यपणे या प्रकारची विमानं ३० ते ४० हजार फुटांवर क्रूझ अर्थात स्थिर सरळ अवस्थेत उड्डाण करतात. विमान एका ठराविक वेगाने पुढे जाणं आणि त्याचवेळी वर जात राहणं अपेक्षित असतं. पण धावपट्टीवर असतानाच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झालेला असावा. त्यामुळे विमानाच्या वेगामुळे ते ६०० फुटांपर्यंत वर वैमानिकांनी नेलं असावं. टेकऑफच्या आधी एक ठराविक वेग असतो. त्या मर्यादेपर्यंत जर बिघाड झाला तर वैमानिक सुरक्षितपणे टेकऑफ रद्द करून धावपट्टीवरच विमान थांबवू शकतात. पण हा बिघाड त्या मर्यादेच्या पुढे वेग गेल्यानंतर झाला असावा. त्यामुळे वैमानिकांना ते विमान वर नेणं भाग होतं”, असं विश्लेषण अमोल यादव यांनी केलं.

इंधन साठ्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढली?

दरम्यान, अहमदाबादहून टेकऑफ केल्यानंतर लगेचच अपघात झाल्यामुळे लंडनपर्यंतच्या प्रवासासाठी विमानात भरलेल्या पूर्ण इंधन साठ्याने पेट घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरही अमोल यादव यांनी भाष्य केलं. “हे विमान लंडनला जाणार होतं. त्यामुळे या विमानात माझ्या अंदाजे ७० हजार किलो एवढं इंधन असणार आहे. म्हणजे १० हजार लिटरचे इंधनाचे सात टँकर भरून इंधन त्या विमानात असणार आहे. त्यामुळे एका क्षणात त्या इंधनानं पेट घेतला. त्यामुळे ही आग विझवणंही कठीण होतं. एवढं इंधन असल्यामुळेच या दुर्घटनेची तीव्रता इतकी वाढली आहे”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसं आहे एअर इंडियाचं बोईंग ७८७?

“बोईंगनं बनवलेल्या विमानांनी जगभर प्रवास करता येतो. ७४७, ७७७, ३५० आणि आता ७८७ ही बोईंगची विमानं एअर इंडियाच्या ताफ्यात आहेत. आंतरदेशीय प्रवासांसाठी ही विमानं वापरली जातात. या विमानात जवळपास १ लाख किलोग्रॅम इतकं इंधन वाहून नेण्याची क्षमता आहे. विनाथांबा बराच लांबचा प्रवास ही विमानं करू शकतात. मुंबईहून थेट न्यूयॉर्कला जाऊ शकतात एवढी बोईंग ७८७ ची क्षमता आहे”, अशी माहिती अमोल यादव यांनी दिली.