करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याच्या पाश्र्वभूमीवर तुतिकोरीनमधील वेदान्तच्या स्टरलाइट प्रकल्पातून चार महिन्यांसाठी प्राणवायूची निर्मिती करण्यास मान्यता देण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी तमिळनाडू सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती, तेव्हा हा प्रकल्प अंशत: सुरू करण्यास अनुमती देण्यात आली. मात्र स्टरलाइट प्रकल्पातून केवळ प्राणवायूची निर्मिती करण्यात येणार असून अन्य विभाग बंदच ठेवले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या विरोधात हिंसक निदर्शने करण्यात आली होती आणि पोलीस गोळीबारात १३ निदर्शकांचा मृत्यू झाल्यानंतर स्टरलाइट प्रकल्प सरकारने मे २०१८ मध्ये बंद केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्याला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकसह अन्य पक्षांचे सदस्य हजर होते. त्या बैठकीत स्टरलाइट प्रकल्पातून केवळ प्राणवायूची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत वेदान्तने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वेदान्तच्या स्टरलाइट उद्योगसमूहाला प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी आणि संबंधित उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठीच केवळ चार महिन्यांसाठी विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे बैठकीत मान्य करण्यात आले.

याला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही स्थितीत या प्रकल्पात अन्य उत्पादन आणि सहवीज प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली जाणार नाही आणि चार महिन्यांनंतर विजेचा पुरवठा खंडित केला जाणार आहे.

या प्रकल्पातून प्राणवायूची निर्मिती होईल त्यामध्ये राज्याला प्राधान्यक्रम असून राज्याची गरज भागल्यानंतरच तो अन्य राज्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्राणवायूच्या निर्मितीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्राणवायू निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आदींची समिती नियुक्त करण्यात आली आहे.