पॅरिस : भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर युरोपमध्ये गव्हाचे दर सोमवारी विक्रमी पातळीवर पोहोचले. उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने भारताने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. युरोपीय बाजारपेठ उघडल्यानंतर गव्हाचे दर टनामागे ४३५ युरो (४५३ अमेरिकी डॉलर) इतके झाले.

रशियाने गेल्या फेब्रुवारीत युक्रेनवर आक्रमण केल्यापासून गव्हाच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आणि त्याचे जागतिक दर वाढत गेले. पूर्वी गव्हाच्या जागतिक निर्यातीपैकी १२ टक्के निर्यात युक्रेनमधून होत होती.

खतांची टंचाई आणि कमी पीक यामुळे जगभरात गहू महाग झाला आहे. गरीब देशांमध्ये दुष्काळ आणि त्यातून सामाजिक असंतोषाची भीतीही निर्माण झाली आहे. मार्च हा आजवरचा सर्वात उष्ण महिना ठरल्यानंतर भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.

गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय १३ मे रोजी घेण्यात आला; परंतु त्यापूर्वी झालेले निर्यातीचे करार पूर्ण करता येतील. मात्र यापुढील निर्यातीसाठी मंजुरी आवश्यक असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. इतर देशांनी ‘त्यांच्या अन्नसुरक्षा गरजा भागवण्यासाठी’ केलेली विनंती भारताने मान्य केली, तर निर्यातीला परवानगी दिली जाऊ शकेल.

भारताची भूमिका..

गव्हाचे कमी उत्पादन आणि जागतिक दरांमध्ये झालेली तीव्र वाढ यांसह इतर मुद्दय़ांमुळे १४० कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेबद्दल काळजी वाटत असल्याने आम्ही निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचा भारताने म्हटले आहे.