दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ i20 या कारचा स्फोट झाला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला तर २२ हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. ज्यामध्ये आता ही माहिती समोर आली आहे की ज्या कारचा स्फोट झाला ती जवळपास ११ तास दिल्लीत होती. अल फलाह विद्यापीठाजवळ ही कार आढळून आली होती. या कारबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली आहेत.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार पहिल्यांदा अल फलाह विद्यापीठाजवळ उढळून आली. रविवारी रात्री दोनच्या सुमारास ही कार या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सकाळी ७.३० च्या सुमारास फरिदाबाद येथील एशियन रुग्णालयाजवळ आढळून आली. त्यानंतर बद्रापूर या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यावरुन सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी पुढे गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे.

मूळ मालक सलमान असल्याची माहिती समोर

पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार,ह्युंदाई कंपनीची i-20 कार या स्फोटांसाठी वापरली गेली. तर या कारचा मूळ मालक दिल्लीतला मोहम्मद सलमान हा आहे. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली. त्यानंतर नदीमने i-20 कार ‘रॉयल कार झोन’ या डीलरला विकली. दरम्यान या कारच्या खरेदी-विक्रीत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता असे सांगितले जात आहे.

उमर नावाचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती समोर

उमर नावाचा दहशतवादी व्हाईट कॉलर मोड्युलसाठी काम करत होता आणि फरीदाबाद मधल्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. ज्या i 20 कारमध्ये स्फोट झाला ती कार डॉ. उमर चालवत होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. १९ ऑक्टोबरला फरिदाबाद या ठिकाणी छापेमारीही झाली होती ज्यानंतर या कारवाईला घाबरुन उमर तिथून पळाला होता आणि त्याने जागा बदलल्या होत्या अशीही माहिती पोलिसांनी दिली.

कार कुठून कुठे गेली?

रविवारी पहाटे २ वाजता- अल फलाह विद्यापीठ परिसर

सोमवारी सकाळी ७.३० ला- एशियन रुग्णालयाच्या बाहेर

सकाळी ८ वाजता कारने बद्रापूर टोल नाका क्रॉस केला.

सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी मोदी मिल ओखला या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी i20 कार थांबली होती.

सकाळी ८.३० ला ही कार डीएनडी उड्डाण पूलावर होती

दुपारी २ वाजता ही कार कॅनॉट प्लेस या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या जवळ उभी होती.

दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी कार लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमध्ये उभी राहिली.

संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी कार पार्किंगच्या बाहेर पडली.