Red Fort Independence Day Vande Mataram : या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाईल, अशी माहिती संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षीचा सोहळा ‘वंदे मातरम’ गीताची १५० वर्षे आणि २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या उद्दिष्टात तरुण भारतीयांचं योगदान यावर केंद्रित असेल.

८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सुमारे २७ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असून, यामध्ये तरुण नवनिर्मितीकार, इंटर्न्स, उद्योजक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचताच संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीत गायलं जाईल. त्यानंतर ते ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील. उपस्थितांना सोबत गाता यावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने निमंत्रण पत्रिकेत या गाण्याचे बोल छापले आहेत.

सोहळ्याच्या दोन मुख्य संकल्पना

वंदे मातरमची १५० वर्षे आणि युवा शक्ती फॉर विकसित भारत@२०४७ या दोन मुख्य संकल्पनांखाली हा सोहळा आयोजित केला जाईल. राजेश कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं की, जंतरमंतरवरील अलीकडच्या घडामोडींचा विचार न करता ‘युवा शक्ती’ ही संकल्पना स्वतंत्रपणे ठरवली गेली होती.

तरुणांना खास आमंत्रण

या सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील तरुणांना आमंत्रित केलं गेलं आहे. राष्ट्रीय नवोपक्रम कार्यक्रमांतर्गत काम करणारे इनोव्हेटर्स, ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’तील उत्कृष्ट इंटर्न्स, विविध सरकारी योजनांचे साहाय्य मिळवणारे स्टार्टअप्स, ‘पंतप्रधान कौशल विकास योजना’ आणि ‘स्टार्ट-अप इंडिया सीड फंड’ अंतर्गत चांगली कामगिरी करणारे तरुण, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाड २०२६ मध्ये पदक जिंकणारे १९ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

‘वंदे मातरम’ संकल्पनेची सजावट

लाल किल्ल्यावरील मुख्य सजावटीमध्येही ‘वंदे मातरम’ची झलक दिसेल. ज्ञानपथावर NCC चे २,५०० विद्यार्थी आणि ‘माय भारत’चे स्वयंसेवक एकत्र येऊन ‘वंदे मातरम’ची मानवी साखळी/आकृती तयार करतील. भारतीय हवाई दलाचे ‘Mi-17’ हेलिकॉप्टर ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांनिमित्त एक बॅनर हवेत घेऊन जाईल आणि लाल किल्ल्यावर उपस्थितांवर पुष्पवृष्टी करेल. पार्श्वभूमीतील ‘व्ह्यू-कटर्स’वर भारताचे आण्विक आणि अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगतीचं दर्शन घडवलं जाईल, तर ‘गार्ड ऑफ ऑनर’ भागात भारताच्या विकसित भारत @२०४७ कडील प्रवासाची प्रचिती देणारी फुलांची सजावट असेल.

राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताचा दर्जा

‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने सरकारने या राष्ट्रीय गीतावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने विशिष्ट अधिकृत कार्यक्रमांमध्ये या गाण्याचे सर्व ६ कडवे गाण्याबाबतचे नियम जारी केले होते. तसंच, संसदेने नुकतंच एक विधेयक मंजूर करून राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ नुसार राष्ट्रीय गीताचा अवमान करणे किंवा त्यात अडथळा आणणे हा आता फौजदारी गुन्हा ठरेल. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या हा कायदा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि संविधानाचं रक्षण करतो.