प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत हिंसाचार भडकला होता. काही शेतकरी लाल किल्ल्यावर पोहचले होते त्यामुळे गोंधळ उडाला होता. दरम्यान या प्रकरणी एक लाख रुपये बक्षिस असलेल्या २१ वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरजोत सिंग, असे त्याचे नाव आहे. याला सोमवारी सकाळी अमृतसर येथून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. गुरजोत याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे पोलीस उपआयुक्त संजीव यादव यांनी सांगितले.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. अनेकांना अटक करण्यात आली होती आणि बरेच जण फरार होते.

लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील गुरजोत सिंग हा फरार होता. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात सामील असलेल्या दीप सिद्धू, जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तर जजबीरसिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. २६ जानेवारीपासून पोलीस गुरजोत या शोध घेत होते.

पोलिसांनी लाल किल्ल्यावरील हिंसाचाराबाबत कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते, त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. आरोपपत्रात पोलिसांनी लाल किल्ल्यावरील हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचे म्हटले होते. या हिंसाचाराची पूर्व तयारी झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हिंसाचार अचानक झाला, असे म्हणने चुकीचे आहे. कारण लोक घटनास्थळी शस्त्रे घेऊन पोहचले होते.  त्यांच्याकडे तलवार, हॉकी, स्टिक अशी शस्त्रे होती. तेथे त्यांनी बराच गोंधळ घातला, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी २ जानेवारीला शांततेत ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी दिली होती, परंतु ट्रॅक्टरसह मोटारसायकलींवर बसलेल्या सुमारे तीनशे जणांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. तेथे त्याने जबरदस्तीने लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि गोंधळ केला. तेथील लोकांनी अवघा लाल किल्लाचे काही वेळ ताब्यात घेतला होता.