Jeffrey Epstein’s Paris paedo hideout Photo: खळबळजनक छायाचित्रं, व्हिडिओ आणि ई-मेलद्वारे करण्यात आलेले दावे यामुळे जेफ्री एपस्टीन प्रकरण जगात गाजत आहे. जगभरातील नामांकीत चेहरे यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आता जेफ्रीच्या पॅरिस येथे असलेल्या फ्लॅटमधील काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. फ्रेंच वृत्तपत्र ले पॅरिसियनने जेफ्रीच्या फ्लॅटचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फ्लॅटमध्ये अश्लील फोटो, अश्लील कृत्य करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि भयावह वातावरण निर्मिती केल्याचे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी लैंगिक कुकर्म घडल्याचा दावा केला जात आहे.

विचित्र, भयावह सजावट

जेफ्री एपस्टीनने २००१ मध्ये हे आलिशान घर खरेदी केले होते. घरात विक्षिप्त सजावट करण्यात आली आहे. घरात गडद लाल रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी गुलाबी आणि नारंगी रंग वापरण्यात आला आहे. येथे सजावटीच्या प्राण्यांची देखील विचित्र पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. याठिकाणी अस्वलाच्या कातडीचा ​​गालिचा, काळवीटांची शिंगे आणि गिधाडं यांची सजावट केली आहे.

एपस्टीनच्या फ्लॅटचे फोटो पाहा

मार्क गॅब्रिएल ड्रॅघी यांनी एक्सवरुन हे फोटो शेअर केले आहेत. २२ अव्हेन्यू फोच येथील एपस्टीनच्या पॅरिस अपार्टमेंटमधील “आयज वाइड शट” सजावट असे कॅप्शन त्यांनी फोटो शेअर करताना दिले आहे.

एपस्टीन आणि त्याची पॅरिस लिंक

एपस्टीनचा पॅरिसमध्ये त्याचा अत्यंत जवळचा समजला जाणारा मित्र आणि मॉडेलिंग एजंट जीन लुक ब्रुनेल राहत होता. ब्रुनेलवर बलात्काराचे आरोप होते. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप त्याच्यावर होते. ब्रुनेलचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने बेडशीटचा वापर करुन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

फ्रान्समध्ये दोन घटना उघडकीस

फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जेफ्री एपस्टीन याच्याशी निगडीत दोन प्रकरणं समोर आली. अमेरिकेच्या विधी विभागाने काही फाईल्स प्रसिद्ध केल्यानंतर याचा खुलासा झाला होता. दरम्यान, फ्रान्सच्या यंत्रणांकडून संबंधित घटनांचा तपास केला जाईल, अशी पॅरिसचे अभियोक्ता लॉरे बेकुआ यांनी फ्रान्स इन्फो रेडिओला माहिती दिली. मानवी तस्करी, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार आणि कर घोटाळा यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.