काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करत वक्तव्य केल्याने राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातल्या खासदारांनी आक्षेप घेतला. नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊ. मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख केला. तसंच यावेळी त्यांनी पॅलेट गनचा उपयोग करण्याचे आदेश कुणी दिले असा पश्न उपस्थित केला. तसंच परीक्षा सुरक्षा सुधारणा विधेयकावर जी चर्चा सुरु होती तेव्हा त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख केला. ज्यानंतर राज्यसभेत हंगामा पाहण्यास मिळाला.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
सरकार आत्तापर्यंत परीक्षा व्यवस्था चांगली करण्यात यशस्वी होऊ शकलेलं नाही. या सरकारकडे व्यवस्था नाही का? यंत्रणा नाही का? तर सगळं आहे, मात्र त्यासाठीचा वेळ नाही. तुमच्या एजन्सी काय करत आहेत? या सरकारकडे उत्तर नाही. २०१५, २०१६, २०२१ आणि २०२६ या वर्षांमध्ये नीटचा पेपर वारंवार फुटला आहे. तसंच त्या त्या वेळी गंभीर आरोपही झाले आहेत. मात्र दरवेळी मोदींची गॅरंटी फेल झाली आहे. मी असं होऊ देणार नाही, पेपर फुटू देणार नाही वगैरे सगळं मोदी सांगतात तरीही पेपरफुटी झाली आहे. तसंच तुम्ही या प्रकरणात शिक्षा कुणाला दिलीत ते सांगा? असा सवालही मल्लिकार्जुन खरगेंनी केला. तसंच तुमचा विकास नेमका कुठे आहे तरी जरा सांगा असा टोलाही लगावला. मागच्या काही वर्षांमध्ये १५२ परीक्षांची पेपरफुटी झाली हा तुमचा विकास आहे का? असं खरगे म्हणाले. यानंतर त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख केला.
मनुस्मृतीचा उल्लेख करत काय म्हणाले खरगे?
शिक्षणाची पद्धत, विषय सगळंच बदलतं आहे. तुम्ही जो अभ्यासक्रम बदलत आहात त्यात क्षुद्रांनी वेद पाठ ऐकला तर त्यांच्या कानात शिसं ओतून कान बंद करा हे सांगितलं जातं आहे. वेद मंत्राचं उच्चार क्षुद्रांनी केला तर जीभ कापली जाते हे शिकवलं जातं आहे. मनुस्मृतीत असलेल्या या तरतुदी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभ्यासक्रम आहे. मी अशा विचारांची निंदा करतो असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. ज्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ झाला.
नेमका काय गदारोळ पाहण्यास मिळाला?
यानंतर जे. पी. नड्डा उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे सांगत आहात तो उल्लेख मनुस्मृतीमध्ये नाही. त्यानंतर खरगे यांनी बनारस हिंदू विद्यापीठातील पुस्तकाचा दाखला दिला आणि गौतम ऋषींचं नाव घेतलं. या प्रकारानंतर भाजपाचे खासदार आणखी चिडले. सुधांशू त्रिवेदी उभे राहिले आणि म्हणाले की हा चुकीचा उल्लेख आहे तुम्ही सभागृहाच्या कामकाजातून हा उल्लेख काढा. ज्यानंतर सभापती म्हणाले की मी हे रेकॉर्डवर घेणार नाही. यानंतर प्रमोद तिवारी उभे राहून म्हणाले जर यातला उल्लेख चुकीचा आहे तर मग हे पुस्तक तुमच्या शासन काळात कसं विकलं जातं आहे? त्यावर बंदी का नाही? सुधांशू त्रिवेदी पुन्हा उभे राहिले त्यांनी कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश विल्यम जोन्स यांच्यासह बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातले उतारे वाचले आणि संदर्भ दिला. तसंच या गदारोळानंतर जे.पी. नड्डा पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे मनुस्मृतीतलं वाक्य नाही, तुम्ही मूळ वाक्यं काय आहेत ती घेऊन या. यानंतर बराच गदारोळ झाला आणि घोषणाबाजीही झाली.
