हल्ली इंटरनेट म्हणजे वाद सुरु होण्याचे आणि संपण्याचे मुख्य ठिकाण बनत आहे
गेले काही दिवस सुरु असणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटना पाहता इंटनेटच्या माध्यमातून या विषयाला बरीच हवा मिळत आहे. वाढता दहशतवाद, ढाक्याच्या दहशतवाद्यांची समोर आलेली नावे या सर्व गोष्टींचे तीव्र पडसाद सोशल नेटव्हर्किंग साइट्सवर निर्विवादपणे उठत आहेत. मात्र अशा या संवेदनशील विषयांवर येणाऱ्या प्रतिक्रियांचा आवेग पाहता ‘धर्मा’चा विषय प्रमाणाबाहेर चघळला जात असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे धर्मापेक्षा ज्यानेत्याने स्वत:चा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे कारण हिंसक विचारांतूनच दहशतवाद सरसावतो अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. सोशल मिडियावरुन सध्या ‘इस्लाम धर्मात सुधारणा करण्यात आली पाहीजे’ अशी मागणी करण्यात येत आहे. रोजच्या घडणाऱ्या घटनांची गंभीरता पाहता आता सोशल मिडिया वापरणाऱ्या वर्तुळातही ‘धर्माशी’ निगडीत विचारांमध्ये बदल होताना दिसत आहेत. ‘हॅशटॅग’ वापरुन व्यक्त होण्याच्या पद्धतीने काही सोशल नेटव्हर्किंग साइट्सवरुन काही समाजसुधारकांबद्दलही चर्चेला वाव मिळत आहे.