अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक तोंडावर असताना विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराची लक्तरे काढणाऱ्या माजी संरक्षण  सल्लागार जॉन बोल्टन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवण्यास संघराज्य न्यायालयाने नकार दिला आहे.

न्या. रॉइस सी. लॅम्बर्थ यांनी पुस्तक प्रकाशनास मनाई करण्यास नकार देताना म्हटले आहे की, जॉन बोल्टन यांच्या ‘दी रूम व्हेअर इट हॅपन्ड’ या पुस्तकाच्या प्रती वितरणासाठी रवाना झाल्या आहेत त्यातील उतारेही अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहेत.

बोल्टन हे ट्रम्प  प्रशासनातील तिसरे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांनाही ट्रम्प यांच्या लहरी कारभाराचा फटका बसून राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी होणार आहे.

न्यायालयाने बोल्टन यांच्यावरही कडक शब्दांत ताशेरे ओढले असून असे म्हटले आहे की, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला नाही, तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केला, त्यामुळे  त्यांना आता नागरी उत्तरदायित्वही पार पाडावे लागेल. या पुस्तकात काही वर्गीकृत माहितीचा समावेश आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायाधीशांच्या निकालाचे स्वागत करताना म्हटले आहे की, हा आमचा मोठा न्यायिक विजय आहे. बोल्टन यांना लोकांवर बॉम्ब टाकून त्यांना मारावेसे वाटत होते. आता त्यांच्यावरच बॉम्ब पडणार आहेत. या  पुस्तकाचे फार वाईट परिणाम बोल्टन यांना भोगावे लागतील हे त्यांनी लक्षात ठेवावे.

बोल्टन यांच्याविरोधात एक दिवाणी दावा प्रलंबित असून त्यामुळे बोल्टन यांच्या पुस्तकातून जो नफा मिळेल तो ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार मिळणार आहे. ओक्लाहोमा येथील सभेला जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी सांगितले की, यातून आता देशाला पैसा मिळणार आहे. बोल्टन यांनी कितीही पुस्तके लिहिली तरी हरकत नाही कारण त्याचा पैसा शेवटी सरकारला मिळणार आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेची माहिती फोडणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जे वार्ताहर अशी माहिती जाहीर करतात त्यांना तुरूंगवासाची शिक्षा दिली पाहिजे.

रिचमंड विद्यापीठाचे कायद्याचे प्राध्यापक कालॅ टोबियस यांनी सांगितले की, बोल्टन यांनी गोपनीय माहिती उघड केली असून त्याबद्दल सरकार त्यांच्यावर फौजदारी खटला भरू शकते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप त्यांच्यावर केला जाऊ शकतो.

ट्रम्प यांनी आताच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयासाठी चीनची मदत मागितली होती, असा आरोप बोल्टन यांच्या पुस्तकात केला आहे.

सीमावादाबाबत भारत-चीनच्या संपर्कात- ट्रम्प

वॉशिंग्टन : सध्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या संदर्भात आम्ही भारत व चीन या दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओक्लाहोमा येथील सभेसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, ही अतिशय अवघड परिस्थिती आहे. आम्ही भारत व चीन या दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. त्या दोन देशात मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्या देशांचे सैन्य हमरीतुमरीवर आले. आपण हे सर्वानी पाहिले आहे. अमेरिका त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत करील.