पीटीआय, न्यूयॉर्क : बुकर पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध परंतु वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या २४ वर्षीय आरोपी हदी मतार याने स्पष्ट केले, की या हल्ल्यात मी एकटाच सहभागी होतो. इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’शी आपला कोणताही संबंध नाही. या हल्ल्यात रश्दी बचावल्याबद्दल त्याने आश्चर्य आणि खेद व्यक्त केला आहे. रश्दी आपल्याला अजिबात आवडत नव्हते, असेही त्याने सांगितले. 

सध्या कारागृहात असलेल्या हदी मतारने ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दूरदृश्य प्रणालीद्वारे दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की या हल्ल्यात रश्दी बचावल्याचे कळाले व फार खेद वाटला. एका ‘ट्विट’द्वारे रश्दी चौटाउक्वा संस्थेत येणार असल्याचे आपल्याला समजले होते. त्यानंतर तेथे जाण्याचा निर्णय मी घेतला. रश्दी मला आवडत नाहीत. ते चांगले नसल्याचे माझे मत आहे. त्यांनी इस्लामवर हल्ला केला आहे. माझ्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांना आपण एक चांगली व्यक्ती म्हणून मानतो. मात्र, १९८९ मध्ये खोमेनी यांनी रश्दी यांच्या ‘द सॅटेनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावरून त्यांना मारण्याचा फतवा प्रसृत केला होता, त्याचे मी पालन केले, असे मी म्हणणार नाही.  इराणनेही या हल्ल्याशी आपला संबंध असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.  मतारने आपला इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’शी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.