एकीकडे करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याची चिन्हं दिसत असतानाच नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. हा व्हेरिएंट करोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याचं अभ्यासातून समोर येत आहे. मात्र या व्हेरिएंटमुळे एकदा करोना होऊन गेलेल्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता इतर व्हेरिएंटच्या तुलनेत तिप्पट आहे.

दक्षिण आफ्रिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. आधी करोना होऊन गेल्याने निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करण्याची या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची क्षमता आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या २.८ दशलक्ष व्यक्तींमध्ये ३५,६७० संशयितांना पुन्हा संसर्ग झाला होता. ९० दिवसांच्या अंतराने जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुन्हा संसर्ग झाला असं मानलं जातं.

हेही वाचा – ओमायक्रॉन व्हेरिएंट खरंच किती धोकादायक? द. अफ्रिकेतीत तज्ज्ञ म्हणतात, “डेल्टाच्या तुलनेत…!”

दक्षिण आफ्रिकन DSI-NRF सेंटर ऑफ एक्सलन्स इन एपिडेमियोलॉजिकल मॉडेलिंग अँड अ‍ॅनालिसिसचे संचालक ज्युलिएट पुलियम यांनी ट्विट केले आहे की, “ज्या व्यक्तींना आधी कोणत्याही लाटेत करोना संसर्ग झाला आहे, त्यांनाच पुन्हा या लाटेतला संसर्ग झाला. पुलियम यांनी सावध केले की लोकांच्या लसीकरण स्थितीबद्दल माहिती उपलब्ध नसल्याने ओमायक्रॉनमुळे लस घेतल्याने मिळालेल्या संरक्षणाला कितपत बाधा होत आहे, याबद्दलचे मूल्यांकन करता येणार नाही.

ओमायक्रॉन संसर्गाशी संबंधित रोगाच्या तीव्रतेबद्दल डेटाची देखील तातडीने आवश्यकता आहे, ज्यात पूर्वीच्या संसर्गाचा इतिहास असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.” असंही पुलियम यांनी सांगितलं. युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनचे शास्त्रज्ञ मायकेल हेड यांनी संशोधनाचे कौतुक केले.