Reliance Retail Fined Consumer Court Compensation: ग्राहक किराणा दुकानातून प्रत्येक वस्तूवरील ‘एक्सपायरी डेट’ तपासणार नाही, हे सांगत हिमाचल प्रदेशच्या ग्राहक आयोगाने रिलायन्स रिटेलला दणका दिला आहे. एक्सपायरी डेट उलटून गेलेले न्यूडल्स खाल्ल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर ग्राहक आयोगाने दुकानाला दंड ठोठावला.
एक्सपायरी डेट उलटून गेलेले पदार्थ दुकानात ठेवणे ही दुकानदाराची अक्षम्य चूक आहे. यामुळे ग्राहक आयोगाने संबंधित ग्राहकाला सदर वस्तूचे पैसे, नुकसान भरपाई म्हणून २०,००० रुपये आणि झालेला कायदेशीर खर्च परत करण्यास सांगितले.
एक्सपायरी उलटून गेलेले स्पायसी कोरियन इन्स्टंट न्यूडल्स विक्री केल्याबद्दल हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील जुगल किशोर यांनी रिलायन्स स्मार्ट पॉईंट या दुकानाविरोधात जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगात धाव घेतली होती. आयोगाचे अध्यक्ष हिमांशू मिश्रा, सदस्य आरती सूद आणि नारायण ठाकूर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली.
“एक्सपायरी डेट उलटून गेलेला कोणताही पदार्थ दुकानातील शेल्फमध्ये न ठेवणे किंवा त्याची ग्राहकांना विक्री होऊ न देणे हे सर्वतोपरी दुकानदाराचे न टाळता येणारे काम आहे. ग्राहकाने दैनंदिन पदार्थ विकत घेत असताना सर्व पदार्थ वर-खाली, आलटून-पालटून पाहून त्याच्यावरील एक्सपायरी डेट पाहणे अपेक्षित नाही”, अशी टिप्पणी ग्राहक विवाद निवारण आयोगाने ६ जुलै रोजी दिली.
मुलगी आजारी पडली
जुगल किशोर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी रिलायन्स स्मार्ट पॉईंट आउटलेटमधून स्पाइसी कोरियन इन्स्टंट न्यूडल्स विकत घेतले होते. याचे त्यांनी पूर्ण पैसेही दिले होते. घरी गेल्यानंतर जुगल किशोर यांच्या मुलीने त्यातील काही न्यूडल्स खाल्ले आणि ती आजारी पडली.
जुगल किशोर म्हणाले की, न्यूडल्स खाल्ल्यानंतर मुलीला उलट्या सुरू झाल्या आणि ती आजारी पडली. यामुळे मी न्यूडल्सचे पाकिट तपासून पाहिले असता त्यावरील एक्सपायरी डेट २८ नोव्हेंबर २०२५ ची असल्याचे दिसून आले. तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेले न्यूडल्स आम्हाला तीन महिन्यांनी विकण्यात आले होते.
एक्सपायर झालेले न्यूडल्स निष्काळजीपणे विकल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला, असा आरोप करत जुगल किशोर यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. या वस्तूसाठी खर्च केलेली रक्कम, नुकसान भरपाई आणि कायदेशीर लढाईसाठी झालेला खर्च परत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
रिलायन्सने जबाबदारी फेटाळली
रिलायन्स रिटेलने या दाव्याचा विरोध केला. न्यूडल्समुळे मुलीची तब्येत बिघडली याचा कोणताही वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेत चाचणी केल्याचा पुरावा आढळलेला नाही, असा युक्तिवाद रिलायन्स रिटेलने केला. तसेच हे पाकिट सीलपॅक होते. त्यावर स्पष्टपणे एक्सपायरी डेट लिहिलेली होती. ग्राहकाने वस्तू घेताना व्यवस्थित तपासणी करायला हवी, असेही दुकान मालकाने सांगितले.
नुकसान भरपाई देण्याचा आदेश
ग्राहक निवारण आयोगाने यावर निकाल देताना म्हटले की, न्यूडल्स २८ नोव्हेंबर २०२५ रोजी एक्सपायर झाले होते. तरीही त्याची २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विक्री करण्यात आली. तसेच रिलायन्स रिटेलने आपली जबाबदारी ग्राहकावर ढकलली आहे, जे आधुनिक ग्राहक कायद्यामध्ये बसणारे नाही. यानंतर ग्राहक विवाद निवारण आयोगाने रिलायन्स रिटेलला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यूडल्सची रक्कम, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याबद्दल १५ हजारांची नुकसान भरपाई आणि कायदेशीर कारवाईसाठी झालेला पाच हजार रुपयांचा खर्च देण्याचे आदेश दिले.
