येथील गजबजलेल्या कामराज सलाई जंक्शन या अत्यंत मोठय़ा अशा गजबजलेल्या रस्त्यावर असलेला शिवाजी गणेशन यांचा पुतळा हलविण्यासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडू सरकारला दिला.
रस्ते आणि आसपासच्या गल्ल्या सामान्य पादचारी तसेच वाहनांसाठी असतात. समाजातील नेते आणि नामवंतांचा आदर राखावा यात दुमत नाही. तरी ही ठिकाणे पुतळ्यांसाठी नाहीत, असे स्पष्ट करून न्यायालयाने उपरोक्त आदेश राज्य सरकारला दिला. शिवाजी गणेशन यांचा पुतळा रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस मोठे अडथळे येत असून मोटारचालक तसेच सर्वसामान्यांनाही त्रास होत असतो. अशा ठिकाणी मान्यवरांचे पुतळे उभारून आपण त्यांच्याप्रतीही अनादर दाखवीत असतो, असे मत विभागीय खंडपीठाचे न्या. सतीश के. अग्निहोत्री व न्या. के. के. शशीधरन यांनी मांडले. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद उत्पन्न होणार नाही, तेथेच स्मारके उभारावीत, रस्त्यांच्या मधोमध नकोत, असाही आदेश न्यायाधीशांनी दिला.