US Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यासाठी अटी ठेवल्यामुळे अद्याप तोडगा निघालेला नाही. असं असतानाच आता इराणने अमेरिकेला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे.

या युद्धादरम्यान अमेरिकेने इराणच्या मिनाब शाळेवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात १७५ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये शाळकरी मुलींचाही समावेश असल्याचा दावा इराणने केला होता. या हल्ल्यानंतर इराणने म्हटलं होतं की, ‘मिनाब शाळेवरील हल्ला ही तांत्रिक चूक नाही, तर १७५ निष्पापांची नियोजित कत्तल आहे.’

दरम्यान, या मिनाब शाळेवरील भीषण हल्ल्याच्या प्रकरणात आता इराणने अमेरिकेला मोठा इशारा दिला असून या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दोन अमेरिकी अधिकाऱ्यांची नावं इराणने जाहीर केली आहेत. ‘या गुन्हेगारांना लक्षात ठेवा’, असं म्हणत इराणने अमेरिकेला इशारा दिल्यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियामधील इराणी दूतावासाने रविवारी एक्सवर (ट्विटर) मिनाब शाळेवरील भीषण हल्ल्याच्या घटनेतील अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि त्यांची नावं प्रसिद्ध केली आहेत. यूएसएस स्प्रुआन्सचे कमांडिंग ऑफिसर ली आर टेट आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जेफ्री ई यॉर्क अशी नावं इराणने जाहीर केली आहेत.

दूतावासाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आरोप केला की, ‘त्या दोन अधिकाऱ्यांनी तीन वेळा टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्याची परवानगी दिली. ज्यामुळे २८ फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला झाला. या दोन गुन्हेगारांना लक्षात ठेवा. ज्यांनी तीन वेळा टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिले, त्यामुळे मिनाबमधील एका शाळेत १६८ निष्पाप मुलांचा बळी गेला’, असं इराणी दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मिनाब शाळेवरील हल्ला ही तांत्रिक चूक नाही, तर नियोजित कत्तल”; इराणचा आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत व्हिडिओद्वारे संबोधित करताना अमेरिका आणि इस्रायलवर ‘युद्ध गुन्हे’ केल्याचा गंभीर आरोप केला. दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील शाळेवर झालेला हल्ला हा ‘नियोजित’ आणि ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ असल्याचं त्यांनी ठामपणे मांडलं.

युद्धाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणच्या मिनाब शहरातील ‘शजराह तय्यबेह’ प्राथमिक शाळेवर भीषण बॉम्बफेक झाली होती. या हल्ल्यात १७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला. अराघची यांनी या घटनेचे वर्णन ‘टप्प्याटप्प्याने केलेला नियोजित हल्ला’ असं केलं. “ज्या वेळी अमेरिकेकडे जगातील सर्वात प्रगत युद्ध तंत्रज्ञान आणि अचूक लष्करी डेटा प्रणाली असल्याचा दावा केला जातो, त्या वेळी शाळेवरील हल्ला चुकून झाला, यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही,” असे अराघची म्हणाले.