परदेशात करिअर आणि कुटुंब यांच्यात निवड करायला लागल्यास अनेकजण करिअर प्राधान्य देतात. मात्र, करिअरमध्ये प्रगती करत असतानाही कुटुंबाला प्राधान्य देता येतं हे बंगळुरूमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी रमेश एनएन यांनी जवळपास सहा वर्षांपूर्वी कॅनडातील नोकरी सोडून वृद्ध आई-वडिलांसोबत राहण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. लिंक्डइनवरील पोस्टमध्ये त्यांनी हा अनुभव आणि त्यातून मिळालेला जीवनाचा धडा शेअर केला आहे.

कुटुंबासाठी वेळ पुढे ढकलता येत नाही

कॉरसेंट्रिक या आयटी कंपनीतील अभियांत्रिकी संचालक रमेश यांनी लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये सांगितले की, कौटुंबिक क्षण केवळ दुरून पाहण्याऐवजी आपल्या आई-वडिलांच्या जवळ प्रत्यक्ष उपस्थित राहणे त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी पुढे लिहिले, एक वेळ येते जेव्हा तुम्ही काही गोष्टी आयुष्यभर पुढे ढकलू शकत नाही. त्यांनी सांगितले, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. परदेशातील स्थिर आरामदायी शैली, चांगले करिअर यांचा त्याग करावा लागला.

कॅनडावरून आल्यावर त्यांचे कुटुंब बंगळुरूमध्ये स्थायिक झाले. रमेश म्हणाले की, व्हिडिओ कॉल्सवर अवलंबून राहण्याऐवजी कुटुंबातील दैनंदिन क्षणांचा भाग बनल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्याचबरोबर बंगळुरूचे वेगवान तंत्रज्ञान क्षेत्र, कुशल मनुष्यबळ आणि स्टार्टअप संस्कृतीमुळे करिअरलाही नवी दिशा मिळाली.

भारतात परतल्यावर पायाभूत सुविधांशी संबंधित आव्हाने, जीवनशैलीतील बदल आणि येथील कार्यपद्धतींशी पुन्हा जुळवून घेणे यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हेही त्यांनी मान्य केले. तरीही, त्यांनी सांगतले की, अडचणींपेक्षा फायदे अधिक महत्त्वाचे होते.

सोशल मीडियावर कौतुक

रमेश यांच्या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले, “मी २०१५ मध्ये अमेरिकेतून भारतात परतलो. सुरुवातीचे वर्ष कठीण होते, पण हळूहळू ते स्वीकारले आणि आता इथेच कुटुंबासोबत स्थायिक आहोत.”

दुसऱ्या यूजरने म्हटले, “यश हे आपण कोणत्या देशात राहतो यावर मिळत नसते, तर आपण नातेसंबंध किती जपतो यावरही अवलंबून असते.”

तर आणखी एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना लिहिले, “माझ्यासाठी कुटुंब सर्वात महत्वाचे आहे. आणि तुम्ही घरी परत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आनंद आहे.”