२०२२ मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून त्यांनी त्यादृष्टीने कामं करायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपादेखील यात मागे नाही. सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला आहे. “भाजपाच्या राजकारणातून धर्म वजा केल्यास ते लोकांना तोंडही दाखवू शकणार नाही” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. ते आज तकच्या पंचायत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीवरूनही भाजपाला सुनावले.

“उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील निवडणुकांमध्ये जात आणि धर्म मोठी भूमिका बजावतात. भाजपा सारखा राष्ट्रीय स्तरावरील पक्षही राज्यातील धर्म आणि जातीपातीचं राजकारण करण्याइतका खालच्या स्तरावर गेलाय हे दुर्दैवी आहे,” असंही तिवारी म्हणाले. तर तिवारींना प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी म्हणाले की, “राज्यात धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जातं नाहीए. जातीभेदाशिवाय भाजपाने राज्यात विकासकामे केली असून आम्ही जनतेचा विश्वास मिळवला आहे.”

राज्यात ब्राह्मण मतांना खूश करण्यासाठी वाढत्या दबावाविषयी बोलत “भाजपा ब्राह्मण मुख्यमंत्री आणणार नाही.” असे तिवारी म्हणाले. तर, “मुख्यमंत्री हा कोणत्या जाती-धर्माचा नव्हे कमळाच्या फुलाचाच असेल,  मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार देतांना आम्ही जात बघत नाही,” असे म्हणत बाजपेयींनी पलटवार केला.  समाजवादी पार्टीचे नेते पवन पांडे यांनीही बाजपेयींवर टीका केली. ते म्हणाले “बाजपेयींनी २०१४ च्या निवडणुकीत खूप मेहनत केली मात्र, तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले. भाजपा ब्राम्हणांचा आदर करत नाही.” त्यांना उत्तर देत बाजपेयी म्हणाले, “तसं काहीचं नाहीए मी अजूनही मैदानात आहे. लोहियांचा पक्ष सोडून परशुरामांच्या पक्षात आलेल्या धार्मिक राजकारणाबद्दल बोलू नये,” असंही त्यांनी पांडेंना सुनावलं.

ब्राम्हणच आम्हाला बोलवत आहेत..

राज्यात समाजवादी पार्टी ब्राह्मणांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. असा प्रश्न विचारला असता ब्राम्हणच आम्हाला बोलवत आहेत, असं पवन पांडे म्हणाले. यावेळी त्यांनी करोना काळात योग्य उपाययोजना न राबवल्याबद्दल भाजपवार टीका केली. “भाजपच्या राजवटीत लोक औषध आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरण पावले.” तर “राज्यातील करोना उपाययोजना आणि व्यवस्थापनाचे इतर देशांनीही कौतुक केले आणि भविष्यात अशा कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत,” असं भाजपाचे बाजपेयी म्हणाले.

“दुर्दैवाने पंतप्रधानांनी ऑक्सिजन आणि लसी स्वतःच्या लोकांसाठी वापरण्याऐवजी इतरांना पाठवल्या. तसेच करोना परिस्थिती नीट हाताळल्याचा त्यांचा दावा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही, या दाव्याइतकाच खरा आहे” असे म्हणत प्रमोद तिवारी यांनी भाजपावर टीका केली.