देशात करोनाची लाटेची तीव्रता अद्यापही ओसरलेली नसून, दररोज मोठ्या संख्येनं मृत्यू होत आहेत. राजकीय नेत्यांसह कला, क्रीडा, संगीत यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. करोनामुळे आणखी एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनिया गांधी (राहुल गांधी आणि प्रियंका गांधी) आणि प्रियंका गांधी यांची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एस.के. भंडारी यांचं निधन झालं आहे. त्या ८६ वर्षांच्या होत्या.

दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या डॉ. एस. के. भंडारी यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना दोन आठवड्यांपूर्वी ह्रदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची करोना चाचणी करण्यात आल्यानंतर संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं. करोनामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती. करोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातच गुरूवारी त्याचा मृत्यू झाला, असं सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी सांगितलं.

डॉ. भंडारी यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जन्मावेळी सोनिया गांधी यांची प्रसूती केली होती. त्याचबरोबर प्रियांका गांधी यांचीही प्रसूती केली होती. डॉ. भंडारी यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी भावूक झाल्या. त्यांनी ट्विट करत आठवणींना उजाळा दिला. “माझा भाऊ (राहुल गांधी), मी आणि माझा मुलगा व मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या सर गंगा राम रुग्णालयातील सेवानिवृत्त डॉ. एस. के. भंडारी यांचं निधन झालं आहे. वयाच्या सत्तरीतही त्या सकाळी सकाळी रुग्णालयात हजर होत असत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्यातील गुणांना कायम ठेवलं. एक अशी महिला जिचा मी नेहमीच सन्मान आणि स्तुती करत आले. एक मैत्रिणी जिची आठवण कायम येत राहिल,” असं प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांची केली सेवा

डॉ. भंडारी यांनी सर गंगा राम रुग्णालयात ५८ वर्ष सेवा केली. लंडनमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्या दिल्लीत परतल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवाला सुरूवात केली होती. रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसृतीशास्त्र विभाग त्यांनीच सुरू केला. इतकंच नाही, तर आयव्हीएफ तज्ज्ञ उपलब्ध नव्हता तरीही त्यांनी डॉक्टरांना रुग्णालयात सुविधा सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं. करोनाची पहिली लाट आली, त्यावेळी त्यांनी रुग्णालयात येणं सुरू केलं. परंतु ह्रदयासंबंधी त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी रुग्णालयात येण बंद केलं. पण घरूनही सल्ला द्यायच्या. ३०-४० वर्षापूर्वी जेव्हा मी दिल्लीत आलो, तेव्हा दिल्लीत दोनच स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसिद्ध होत्या. एक एस. के. भंडारी आणि दुसऱ्या होत्या डॉ. शैला मेहरा,” अशी माहिती देत डॉ. राणा यांनी भंडारी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.