सोशल मीडिया आणि डिजिटल युगात दररोज नवनवीन सायबर गुन्हे समोर येत आहेत. आता सायबर भामट्यांनी तरुण मुली आणि महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी एक भयंकर असा नवा फंडा शोधून काढला आहे, ज्याचे नाव आहे ‘रेंट अ बॉयफ्रेंड’ म्हणजेच ‘बॉयफ्रेंड भाड्याने घ्या’. एकांतपणा घालवण्याच्या नावाखाली महिलांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात असून, हैदराबाद पोलिसांनी याप्रकरणी जाहीर इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकर्षक जाहिरातींच्या जाळ्यात अडकून अनेक महिला आपले पैसे गमावत आहेत. हा सायबर स्कॅम नेमका कसा चालतो आणि त्यापासून कसा बचाव करायचा, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे हा ‘रेंट अ बॉयफ्रेंड’ ट्रॅप?

तेलंगणातील हैदराबाद शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “Rent Boyfriend – Your Personal Companion” अशा नावांनी जाहिराती चालवत आहेत.

या जाहिरातींमध्ये एआय (AI) द्वारे तयार केलेले किंवा इंटरनेटवरून चोरलेले आकर्षक तरुणांचे फोटो वापरले जातात. एकांतात सोबत हवी असणाऱ्या किंवा डेटवर जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना या जाहिरातींद्वारे आकर्षित केले जाते.

रक्कम आणि पॅकेजेस:
भामट्यांनी यासाठी वेगवेगळ्या दरांचे आकर्षक पॅकेजेस तयार केले आहेत:

  • ₹४९९: १ तासासाठी कॉफी डेट
  • ₹१,२४९: चित्रपटासाठी (मराठी/हिंदी सिनेमे किंवा डेट) सोबत
  • ₹१,४९९: शॉपिंगसाठी सोबती
  • ₹१,९९९: लग्न किंवा कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी
  • ₹४,४९९: तब्बल १० तासांचे ऑल-इन-वन पॅकेज

फसवणूक कशी केली जाते? (Modus Operandi)

१. प्रायव्हसीचे आमिष: या जाहिरातींमध्ये महिलांची ओळख पूर्णपणे गुप्त राखली जाईल, असे आश्वासन दिले जाते.
२. सुरुवातीचे संभाषण: जाहिरातीला प्रतिसाद देऊन महिलांनी डायरेक्ट मेसेज (DM) केल्यावर, समोरील व्यक्ती अत्यंत गोड आणि मैत्रीपूर्ण भाषेत संवाद साधते.
३. अ‍ॅडव्हान्स आणि बुकिंग चार्ज: बुकिंग कन्फर्मेशन, सिक्युरिटी डिपॉझिट किंवा अ‍ॅडव्हान्स पेमेंटच्या नावाखाली डिजिटल वॉलेट (GPay, PhonePe) किंवा क्यूआर (QR) कोडद्वारे पैसे मागितले जातात.
४. ब्लॉक आणि गायब: एकदा पैसे बँक खात्यात जमा झाले की, ते अकाउंट तात्काळ ब्लॉक केले जाते आणि संपर्क तोडला जातो.

पोलिसांचा गंभीर इशारा

ज्येष्ठ आयपीएस अधिकारी व्ही. सी. सज्जनार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत नागरिकांना सतर्क केले आहे.

“एकटेपणा वाटतोय? कॉफी पिण्यासाठी किंवा सिनेमाला जाण्यासाठी हँडसम मुलगा हवाय? तेही ५०% सवलतीत? …सोशल मीडियावर फिरणाऱ्या या रंगीबेरंगी पोस्टर्समागे एक मोठा सायबर फ्रॉड लपला आहे. तरुण मुली आणि महिलांना लक्ष्य करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी रचलेला हा एक नवा डेटिंग ट्रॅप आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महिला आणि तरुणींनी काय काळजी घ्यावी?

  • अनोळखी व्यक्तींना माहिती देऊ नका: सोशल मीडियावर कोणाशीही आपले वैयक्तिक फोटो, फोन नंबर किंवा लोकेशन शेअर करू नका.
  • ब्लॅकमेलिंगचा धोका: वैयक्तिक माहिती भामट्यांच्या हाती लागल्यास ते ब्लॅकमेलिंग किंवा खंडणीची मागणी करू शकतात.
  • पैसे पाठवणे टाळा: ऑनलाइन भेटलेल्या किंवा न पाहिलेल्या व्यक्तीला कोणतेही अ‍ॅडव्हान्स पैसे अथवा सिक्युरिटी डिपॉझिट देऊ नका.

फसवणूक झाल्यास त्वरित काय करावे?

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही व्यक्ती अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली असेल, तर घाबरून न जाता तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर ‘1930’ वर संपर्क साधावा. याशिवाय राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (cybercrime.gov.in) वर जाऊन तक्रार नोंदवावी.