सीमेवरील चीनच्या कुरापतींचा पर्दाफाश, अमेरिकन संरक्षण विभागाच्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात चीनकडून सीमेवर छुप्या कुरापती सुरूच असल्याचं अमेरिकेच्या एका अहवालात उघड झालंय.

भारत-चीन सीमेवर मागील १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात चीनकडून सीमेवर छुप्या कुरापती सुरूच असल्याचं अमेरिकेच्या एका अहवालात उघड झालंय. चीन भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भूभागावर आपला दावा करण्यासाठी हालचाली करत असल्याचं ३ नोव्हेंबरला प्रकाशित झालेल्या अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या वार्षिक अहवालात नोंदवण्यात आलंय.

स्वायत्त तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर २०२० मध्ये चीनने वादग्रस्त क्षेत्रात जवळपास १०० घरांचं मोठं नागरी गाव वसवल्याचंही अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने या अहवालात नोंदवलं आहे. यामुळे सीमेवर आपल्या विस्तारवादी उद्देशानं चीन घुसखोरी करत असल्याचं स्पष्ट झालंय.

भारत-चीन सीमेवर चीनकडून होणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास हा भारत सरकार आणि माध्यमांमध्ये अस्वस्थतेचा मुद्दा ठरत आहे. २०२१ च्या हिवाळ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तैनात सैनिक मागे घेण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली असतानाही हे सैन्य ‘जैसे थे’ आहे. यामागे दोन्ही देशांच्या सैन्य कमांडर स्तरावरील चर्चा निष्फळ ठरल्याचं कारण असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय.

जून २०२० मध्ये झालेल्या संघर्षाची नोंद करत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या अहवालात म्हटलं, “८ सप्टेंबर २०२० रोजी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पँगाँग लेकजवळ भारतीय सैनिकांना इशारा देत गोळीबार केला होता. मागील अनेक दशकांमधील हा पहिला प्रकार आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूने इशारा देणारा गोळीबार झाल्याचं म्हटलं आहे. कैलास पर्वतरांगेत पँगाँग तलावाच्या उत्तरेला आपलं वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न होत आहेत.”

मे २०२० मध्ये पीएलएने भारताच्या नियंत्रणातील भूभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वेगवेगळ्या ठिकाणी सैन्य तैनात केलं. याशिवाय तिबेट आणि झिंझियांग या लष्करी जिल्ह्यातील सैन्य पश्चिम चीनमध्ये हलवण्यात आलं. याचा वापर तातडीने सीमेवर कुमक पोहचवण्यासाठी केला जातो. यानंतरच जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला आणि यात २० भारतीय जवान शहीद झाले. १९७५ नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर सैनिकांच्या संघर्षातून मृत्यूची घटना घडली. जून २०२१ मध्ये सैन्य स्तरावरील चर्चेतून मार्ग न निघाल्यानं चीन आणि भारताने प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर मोठ्या प्रमाणातील सैन्य तैनाती कायम ठेवलीय, असंही यात नमूद करण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Report of american defense department on india china standoff and reasons pbs

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी