#10YearsChallenge ‘अब की बार, मोदी सरकार’.. ‘अच्छे दिन आएंगे’…पासून सुरू झालेला प्रवास आता ते ‘चौकीदार चोर है’ पर्यंत येऊन ठेपला आहे. यूपीए सरकारविरोधातील रोष आणि नरेंद्र मोदी यांचा देशभरात प्रभाव वाढण्याची प्रक्रिया साधारणत: २०११-१२ पासून सुरू झाली. मात्र मोदींचा झंझावात त्या आधीच सुरू झाला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनंतर पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून मोदींचे नाव पुढे आले. २००२ मधील दंगलीचा डाग पुसत विकासपुरूष अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात मोदींना यश आले. यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणारे पंतप्रधान म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी १३ वर्षे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या मोदींनी ‘गुजरात मॉडेल’ देशासमोर मांडले. याचे देशभरात मोठे कौतुकही झाले. त्यावेळी देशभरातील माध्यमं विरोधात असतानाही सोशल मीडियाचा अगदी कौशल्याने वापर करत त्यांनी स्वत:ची तर प्रतिमा निर्माण केलीच शिवाय यूपीए सरकारवर होते-नव्हते ते सर्व ‘आरोप’ करून पद्धतीशीरपणे त्यांच्या प्रतिमेचे हननही केले. थोडक्यात देशाच्या राजकारणात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणारे मोदी हे पहिलेच नेते ठरले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. योगायोग म्हणजे मोदींनी १ मे २००९ म्हणजे १० वर्षांपूर्वी आपले अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरू करून सोशल मीडियावरील श्रीगणेशा केला होता. त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले.

अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ज्याप्रमाणं चित्रपटात नायकाची ‘लार्जर दॅन इमेज’ दाखवली जाते अगदी तसंच किंबहुना त्याहूनही अधिक प्रभावी पद्धतीने त्यांची प्रतिमा जनतेत ठसवण्याचे काम सोशल मीडियावरून करण्यात आले. दुसऱ्या कार्यकाळातील यूपीए सरकारची कामगिरी कशी निराशाजनक आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली होती, हे दाखवण्यात भाजपा यशस्वी ठरले होते. या संकटावर ‘नरेंद्र मोदी’ हा एकच उपाय असून स्वीस बँकेतील काळा पैसा आणणे असो, पाकिस्तानला धडा शिकवणे असो, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणे असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या अनेक अशक्यप्राय गोष्टींचे उत्तर फक्त ‘५६ इंच छातीचे’ मोदीच देऊ शकतील अशी धारणा जनतेमध्ये झाली किंवा तशी निर्माण करण्यात त्यांना यश आले.

भाजपाचे पर्यायाने मोदींचे राजकीय शत्रू राहुल गांधी हेही सोशल मीडियावर पूर्वीपासून होते. पण ते खऱ्या अर्थाने ‘अॅक्टिव्ह’ झाले ते काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर. आज राहुल गांधींही सोशल मीडियावर मोदींना टक्कर देत आहेत. मात्र, मोदी हे सहसा आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राहुल गांधींचा उल्लेख टाळतानाच दिसले आहेत.

नमो v/s रागा हे युद्ध आता सोशल मीडियावर चांगलेच रंगलेले दिसते. मोदींची मागील साडेचार वर्षांतील अनेक भाषणे मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली असून मोठ्या संख्येने त्याला व्ह्यूजही मिळाली आहेत. मोदींनी मेडिसन स्वेक्अरवर केलेले भाषण, संसदेत केलेले भाषण, जर्मनीत भारतीय समुदायासमोर केलेले भाषण, ससंदेत काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांच्यावर साधलेला निशाणा आदी विषयांवरील त्यांची भाषणे सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. आज सर्वच पक्षांनी किंवा त्यांच्या आघाडीच्या नेत्यांनी सोशल मीडियाचा आक्रमकपणे वापर करायला सुरूवात केली आहे. त्याचे परिणाम सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्मवर दिसूनही येतात. भाजपाच्या ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ‘काऊंटर अॅटक’ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जे काही वर्षांपूर्वी अत्यंत नगण्य होते.

मध्यंतरी अमेरिकेतील एक अभ्यासक जोयोजित पाल यांनी सोशल मीडियावर मोदींकडून करण्यात येणाऱ्या पोस्टचा अभ्यास केला. मोदींनी सोशल मीडियाचा वापर मुद्यांऐवजी वैयक्तिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी केल्याचे मत पाल यांनी आपल्या अहवालात नोंदवले आहे. पाल हे मिशिगन्स स्कूल ऑफ इन्फर्मेशन येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. भारतातील युवा पिढीच्या आकांक्षाबरोबर स्वत:ला जोडत सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी मोदींनी सोशल मीडियाचा यशस्वी वापर केला असल्याचे पाल यांनी म्हटले आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात ‘चाय पे चर्चा’सारखी मोहीम सुरू केली. त्या अंतर्गत चहा पिताना ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणे हा हेतू होता.

मोदी विशेषत: ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. विविध सणवार, उत्सव, नेत्यांची जयंती, निधन, यश आदी विषयांवर ते सातत्याने ट्विट करताना दिसतात. प्रादेशिक भाषेसह ज्या देशात जातात तेथील भाषांमध्येही ते ट्विट करतात. त्यांचे ट्विट रिट्विटही मोठ्याप्रमाणात केले जातात.

ट्विटर फॉलोअर्सच्या आकडेवारीत ते जगात तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक फॉलोअर्स हे डोनाल्ड ट्रम्प आणि पोप फ्रान्सिस यांचे आहेत. जुलै २०१८ च्या आकडेवारीनुसार मोदींचे ४.२ कोटी फॉलोअर्स आहेत. तर त्यांच्या पीएमओ इंडियाचे २.६ कोटी फॉलोअर्स आहेत.

मोदी हे फक्त ट्विटर आणि फेसबुकवरच आघाडीवर नाहीत तर फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही ते पुढे आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या जागतिक नेत्यांमध्ये ते टॉपवर पोहोचले आहेत. ‘टिप्लोमेसी’ने डिसेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्या तर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर पोप फ्रान्सिस हे आहेत. इथेही मोदींनी बाजी मारल्याचे दिसते.

इन्स्टाग्रामवर मोदींचे फॉलोअर वेगाने वाढत आहेत. मागील एक वर्षांत त्यांच्या फॉलोअर्सचा ग्रोथ रेट ५० टक्क्यांहून अधिक आहे. याच काळात ट्रम्प यांची वाढ ही फक्त ३२ टक्क्यांची नोंदवण्यात आली आहे. मोदी हे १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये इन्स्टाग्रामवर आले. त्यांनी या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा आशियाई परिषदेतील फोटो शेअर केला होता.

मे २०१८ मधील एका अहवालानुसार फेसबुकवरील लाइक प्रकारातही पंतप्रधान मोदींनी सर्वांना मागे टाकले आहे. फेसबुकवर मोदींना ४३.३ मिलियन लाइक्स मिळाले आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मोदींनी २०१४ मध्ये कामगिरी फत्ते करून दाखवली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशातील इतर पक्षांनाही सोशल मीडियाचे महत्व चांगलेच पटल्याचे दिसते. अनेक राजकीय पक्षांनी आता सोशल मीडियाला गांर्भीयाने घेतले आहे. प्रत्येकजण याचा वापर करताना दिसतोय. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदी आणि भाजपाला सोशल मीडिया तारणार की त्यांनाही याचा फटका बसणार हे येत्या काही महिन्यात लवकरच समजेल.

  • दिग्विजय जिरगे

divijay.jirage@gmail.com