पीटीआय, नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर ७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान हवाई दलाच्या बँड पथकात प्रथमच नऊ महिला अग्निवीर सहभागी होऊन वाद्यवृंद वाजवणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका पत्रकार परिषदेत हवाई दलाने ही घोषणा केली. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या औपचारिक संचलनात फ्लाईट लेफ्टनंट अक्षिता धनखड या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर राष्ट्रध्वज फडकवतील.
हवाई दलाच्या बँडचे नेतृत्व सार्जंट चार्ल्स अँथनी डॅनियल करतील. हा बँड हवाई दलाच्या १४४ सदस्यांच्या संचलन पथकाला साथ देईल, ज्याचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर जगदेश कुमार करणार आहेत. स्क्वाड्रन लीडर निकिता चौधरी, फ्लाइट लेफ्टनंट प्रखर चंद्राकर आणि फ्लाइट लेफ्टनंट दिनेश मुरली हे हवाई दलाच्या या पथकात ‘सुपरन्यूमररी’ अधिकारी म्हणून काम पाहतील.
संचलनादरम्यान दोन टप्प्यांत होणाऱ्या ‘फ्लायपास्ट’मध्ये एकूण २९ विमाने सहभागी होतील. यामध्ये १६ लढाऊ विमाने, ४ मालवाहू विमाने आणि ९ हेलिकॉप्टरचा समावेश असेल. संचलनादरम्यान एकूण आठ हवाई रचना पाहायला मिळतील, असे हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हवाई दल मुख्यालयामधील संचालनालयाचे एअर कमोडोर इम्रान एच. झैदी यांनी सांगितले की, ७५ सदस्यीय हवाई दल बँडमध्ये ६६ अग्निवीर असतील आणि उर्वरित हवाई योद्धा असतील. या ६६ अग्निवीरांमध्ये नऊ महिला अग्निवीरांचा समावेश आहे आणि संचलनातील हवाई दल बँडचा भाग होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल.
