Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?| republic day president draupadi murmu accompanied by egyptian president abdel fattah el sisi to the venue first time 9 rafale aircraft participated | Loksatta

Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?

आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत तिन्ही दलांचं संचलन पार पडलं, तसंच राफेलसह इतर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकंही पाहण्यास मिळाली

Republic Day Parade
प्रजासत्ताक दिनी राफेल विमानांची प्रात्यक्षिकं

भारत देश आज आपला ७४ वा गणतंत्र दिवस साजरा करतो आहे. हेच औचित्य साधत दिल्लीतल्या कर्तव्य पथावर गणतंत्र दिवसाची कवायत पार पडली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतल अल सिसी हे या वर्षी गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे होते. या वर्षीचा गणतंत्र दिवस खास होता. राफेल या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं आजच्या सोहळ्यात पाहण्यास मिळाली.

काय काय घडलं आज दिवसभरात?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांच्यासह कार्यक्रमच्या ठिकाणी पोहचल्या. गणतंत्र दिवसाची कवायत सुरू करण्यासाठी त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आपल्या देशाची शक्ती सगळ्या देशाने पाहिले. कर्तव्य पथ या पथाचं नाव आधी राजपथ असं होतं. आज याच ठिकाणी सैन्याच्या तिन्ही दलांचं संचलन पार पडलं.

या कवायतीची सुरूवात इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या एका कवायतीने झाली. यामध्ये इजिप्तच्या सशस्त्र दलांचं प्रतिनिधीत्व करणारे १४४ सैनिक सहभागी झाले होते. केंद्रीय राखी पोलीस दलाच्या महिलांच्या तुकडीनेही कवायत केली. एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात नौदलाच्या तीन महिला आणि सहा अग्नीवीर सहभागी झाले होते. न्यूज १८ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

परेडमध्ये रशियन बनावटीचा एकही टँक नव्हता

आत्मनिर्भरता हाच आदर्श आहे हे वाक्य सार्थ ठरवण्यात आल्याचं कवायतीत दिसलं. आज कवायतीत रशियाचा एकही टँक नव्हता. भारतात निर्मिती करण्यात आलेले अर्जुन आणि आकाश या क्षेपणास्त्र या कवायतीत सहभागी झाली होती. तसंच भारतीय निर्मितीची अनेक शस्त्रही या परेडमध्ये दाखवली गेली

आजच्या दिवसाच्या औचित्याने संपूर्ण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा गणतंत्र दिवस विशेष आहे कारण आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि त्याच दरम्यान हा दिवस आपण साजरा करतो आहोत. माझी इच्छा आहे की आपल्या देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट केली पाहिजे.

आजच्या कवायतींमध्ये २३ चित्ररथ सहभागी झाले होते

आज झालेल्या गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये एकूण २३ चित्ररथ सहभागी झाले होते. ज्यामध्ये १७ राज्यं आणि सात केंद्रशासित प्रदेश आणि सहा विविध सरकारी मंत्रालयांचा सहभाग होता. भारताची संस्कृती, आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षा हे विषय या चित्ररथांसाठी निवडण्यात आले होते. राष्ट्रव्यापी वंदे मातर या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या ४७९ कलाकारांनी सांस्कृतिक नृत्यं सादर केली.

कोर ऑफ सिग्नल्सच्या डेअर डेविल्स द्वारे मोटरसायकलची प्रात्यक्षिकं दाखवली. साहस, कला, संस्कृती, खेळ, समाजसेवा या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लहान मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

गणराज्य दिवसाच्या निमित्ताने विविध विमानांची हवाई प्रात्यक्षिकंही सादर करण्यात आली आहेत. यामध्ये तिन्ही दलाच्या विमानांनी सहभाग घेतला. ४५ विमानांच्या एअर शोमध्ये व्हिंटेज विमानांनासह भारतीय वायू सेनेतली आधुनिक विमानंही सहभागी झाली होती. राफेलची नऊ विमानं या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. राफेल विमानांनी व्हर्टिकल चार्ली हे प्रात्यक्षिक दाखवलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:26 IST
Next Story
Elon Musk यांनी ट्विटवर बदललं नाव, नेटकरी हसून हसून बेजार