दिल्लीत प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलिस व निमलष्करी दले तैनात करण्यात आली असून, हवाई मार्गाने हल्ला झाल्यास तो हाणून पाडण्याची तयारी केली जात आहे. हवाई हल्ल्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तवली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजपथावर सलामी स्वीकारणार असून, त्यासाठी खास सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मध्य व नवी दिल्ली भागात पन्नास हजार सुरक्षा जवान तैनात केले आहेत.

लष्कर ए तोयबा भाडोत्री हेलिकॉप्टर्स वापरून हल्ले करण्याची भीती आहे. पोलिस ड्रोनविरोधी तंत्रज्ञान वापरणार असून, कुठलाही हवाई हल्ला किंवा उडत आलेली संशयास्पद वस्तू ओळखून हल्ला विफल करू शकतात. सुरक्षा जवान उंच इमारतींवर तैनात केले असून, त्यांच्याकडे विमानविरोधी बंदुका दिल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यातील चित्रण नियंत्रण कक्षात बघितले जाणार आहे. सल्ला सूचना जारी करण्यात आल्या असून, सुरक्षा दलांनी सज्ज राहण्यास सांगितले आहे. दहशतवादी गट या वेळी नवीन तंत्र वापरण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. पोलिस व इतर जवानांची झडती घ्यावी, कारण दहशतवादी जवानांच्या वेशात येऊ शकतात असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आत्मघाती पथके सुरक्षा दलांचा पोशाख वापरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही उपाययोजना केली जाणार आहे.

विमाने व हेलिकॉप्टर्सचा वापर करून ९/११ सारखा हल्ला करण्याचा मुस्लिम दहशतवाद्यांचा इरादाही असू शकतो. दरम्यान, नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.३५ ते दुपारी १२.१५ दरम्यान विमानांची उड्डाणे होणार नाहीत.

महत्त्वाचे मुद्दे

  • प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीत ५० हजार जवान तैनात
  • लष्कर ए तोयबा हेलिकॉप्टर्सनी हल्ला करण्याची शक्यता असल्याचा गुप्तचरांचा इशारा
  • सकाळी १०.३५ ते दुपारी १२.१५ विमान वाहतूक बंद