सिनेटच्या ३६ आणि प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीच्या मानहानीकारक निकालांनंतर आता ओबामा यांना आपली अध्यक्षपदाची अखेरची दोन वर्षे रिपब्लिकनांचे वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसशी ‘जुळवून घेत’ काढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ‘रिपब्लिकन्स’नी मिळवलेला या विजयामुळे त्यांच्या जागांच्या आधिक्यात होणारी वाढ दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी आहे.
३६ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीनंतर सिनेटमध्ये असलेल्या १०० पैकी ५२ जागांवर रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींनी मुसंडी मारली तर डेमोक्रॅटिक पक्षाचे संख्याबळ ४५ वर आले. प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या संख्याबळासही या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने धक्का दिला. २४३ जागांवर या पक्षाच्या प्रतिनिधींनी लक्षणीय आघाडी मिळवली तर डेमोक्रॅटिक पक्षाला मात्र अवघ्या १७५ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधीगृहातील सदस्यबळ २३३ होते तर डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यबळ १९९ होते. या पराभवानंतर अनेक राजकीय निरिक्षकांनी ‘निष्प्रभ आणि निस्तेज’ अशा शब्दांत अध्यक्ष ओबामा यांची संभावना केली असून अमेरिकी जनतेच्या मनांत विद्यमान राजकीय नेतृत्वाविषयी असणारा असंतोष या निवडणुकीतून समोर आल्याचे नमूद केले आहे.
देशाच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर प्रतिनिधीगृह (काँग्रेस) आणि सिनेट अशा दोन्ही ठिकाणी वर्चस्व मोडीत निघण्याची वेळ ओबामांवर आली. मात्र अशा नामुष्कीस सामोरे जाणारे ते पहिलेच अध्यक्ष नाहीत. सलग तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षांवर ही नामुष्की ओढवली आहे.
ठळक वैशिष्टय़े
*प्रतिनिधीगृहातील (काँग्रेसमधील) महिलांची सदस्यसंख्या प्रथमच १०० वर
*रिपब्लिकनच्या तिकिटावर प्रथमच कृष्णवर्णीय महिला – मिया लव्ह, जिंकली
*१८७० पासून प्रथमच दक्षिणेतून (हा भाग गुलामीसाठी कुप्रसिद्ध होता) आफ्रिकी वंशाचा अमेरिकी नागरिक टीम स्कॉट विजयी
*सायरा ब्लेयर, वय वर्षे १८ ही राज्याच्या कायदेमंडळावर निवडून येणारी सर्वात लहान प्रतिनिधी
मानहानीकारक पराभव कशासाठी?
डेमोक्रेटिक पक्षाच्या या पराभवामुळे ओबामा यांना आपली धोरणे रेटताना रिपब्लिकन पक्षाच्या अडथळ्याचा वारंवार सामना करावा लागणार आहे. तसेच ज्येष्ठ सरकारी अधिकारी, न्यायाधीश आणि मंत्रिमंडळाचे सदस्य नेमण्याच्या ओबामा यांच्या अधिकारावरही रिपब्लिकनांचा ‘अधिक्षेप’ होणार आहे. तसेच उत्तरेकडील बहुतांश राज्यांवरील डेमोक्रॅटिक पक्षाची पकड या निकालांनंतर पूर्णपणे मोडीत निघाली आहे.
भारतीयांची मोहर
या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी विजयी मुद्रा उमटवली आहे. दक्षिण कॅरोलीना प्रांताच्या गव्हर्नर निक्की हॅले आणि कॅलिफोर्नियातील अ‍ॅटर्नी जनरल कमला हॅरीस यांनी सलग दुसऱ्यांदा आपल्या पदावर निवडून येण्याचा मान मिळवला. ४२ वर्षीय निक्की रिपब्लिकन पक्षाच्या असून त्यांनी ५७.८ टक्के मते मिळवीत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला, तर ५० वर्षीय हॅरीस यांनी सलग दुसऱ्यांदा कॅलिफोर्नियाचे अ‍ॅटर्नी जनरलपद मिळवले. कोलोरॅडोमधील ‘सिक्स्टींथ् डिस्ट्रिक्ट’मधून रिपब्लिक पक्षाचे जनक जोशी विजयी झाले. भारतीय वंशाचे डॉक्टर प्रसाद श्रीनिवासन् यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर कनेक्टिकटमधील ‘थर्टी फस्ट डिस्ट्रिक्ट’मधून विजयश्री संपादन केली. मिशिगन हाऊसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या साम सिंग यांनी मुसंडी मारली. मेरीलँडमध्ये कुमार भरवे आणि अरुणा मिलर यांनी विजय मिळवला. वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमिला जयपाल यांनी सलग दुसऱ्यांदा सिनेटवर निवडून जाण्याचा मान मिळवला. भारतीय वंशाच्या अमी बेरा आणि रो खन्ना यांच्यातील निवडणूक चुरशीची झाली असून बेरा आपल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा ४०० मतांनी आघाडीवर होत्या.
यंग इंडिया..
वय अवघे २३ वर्षे. ओळख- भारतीय वंशाचा अमेरिकी विद्यार्थी. आणि मुक्काम.. थेट ओहियो प्रतिनिधीगृह. हा थक्क करणारा प्रवास आहे नीरज अंतानी या युवकाचा! गेल्याच वर्षी डेटन विद्यापीठातून पदवी संपादन करणाऱ्या नीरजचा प्रतिनिधिमंडळावर जिंकून येणाऱ्या सर्वात तरुण लोकप्रतिनिधींच्या यादीत समावेश झाला आहे. डेटन विद्यापीठातून विधी विषयातील पदवी संपादन करणारा नीरज हा ओहियो राज्य कायदे मंडळातील सर्वात तरुण प्रतिनिधी ठरला आहे. या निवडणुकीत नीरजने ६२ वर्षीय पॅट्रिक मॉरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. २००६ पासून सलग तीन वेळा ओहियो कायदेमंडळावर निवडून येणाऱ्या भारतीय वंशाच्या जय गोयल यांच्यानंतर हा मान मिळवणारा नीरज हा अमेरिकन वंशाचा दुसरा भारतीय नागरिक ठरला आहे. अमेरिकेतील सर्व राज्यांच्या कायदेमंडळातील एकूण प्रतिनिधींची संख्या ७३०० असून त्यापैकी जवळजवळ पाच टक्के प्रतिनिधी ३० वर्षांखालील आहेत.