पीटीआय, वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी- शृंगार गौरी परिसराचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने नेमलेले वकील- कमिशनर बदलण्याची विनंती येथील जिल्हा न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आणि या कमिशनरच्या मदतीसाठी आणखी दोन अतिरिक्त वकील- कमिशनर (अ‍ॅडव्होकेट- कमिशनर) नेमले. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण १७ मेपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल १७ मेपर्यंत सादर करावा, असेही निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची बाजू मांडणारे अ‍ॅड. अभय नाथ यादव यांनी दिली.

मशीद परिसरात स्थित दोन तळघरे व्हिडीओ चित्रीकरणासाठी उघडण्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करणारे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय दिला. मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने नेमलेले अधिकारी अजय कुमार मिश्रा हे नि:पक्षपाती नसल्याचा दावा करून, त्यांना बदलण्यात यावे, असा अर्ज ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने केला होता.