लंडन : कोविड १९ विषाणूचा संसर्ग हा कमी तापमान व आद्र्रतेशी संबंधित असून तो मोसमी इन्फ्लुएंझासारखा आहे. त्याबाबतचे ठोस पुरावे संशोधकांना मिळाले आहेत.

नेचर कॉम्प्युटेशनल सायन्स या नियतकालिकात म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ विषाणूचा संसर्ग हवेतून होऊ शकतो. त्यामुळे हवेसंबंधित शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. स्पेनमधील बार्सेलोना इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लोबल हेल्थ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ विषाणू हा इन्फ्लुएंझाच्या विषाणूसारखा मोसमी विषाणू आहे. वर्षांतील कुठल्याही टप्प्यात तो सारखाच पसरू शकतो. 

सैद्धांतिक प्रारूपावर आधारित अभ्यासात यापूर्वी असे सांगण्यात आले होते की, या विषाणूच्या संसर्गाचा हवामानाशी संबंध नाही, कारण अनेक व्यक्तींमध्ये त्यावेळी या विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार झालेले नव्हते.

चीनमध्ये सुरुवातीला हा विषाणू कसा पसरला याबाबतच्या निरीक्षणांचा विचार केला तर त्यावेळी तापमान ५ ते ११ अंश सेल्सियसच्या दरम्यान होते. आद्र्रताही कमी होती. ३० ते ५० उत्तर अक्षांशाच्या प्रदेशात हा प्रसार झाला होता. कोविड १९ हा मोसमी आजार आहे का, या प्रश्नावर विचार केला असता त्यात तो मोसमी आजार असल्याचेच जास्त प्रमाणात दिसून आले आहे, असे क्लायमेट अँड हेल्थ प्रोग्रॅम या संस्थेचे संचालक झेवियर रोडो यांनी म्हटले आहे. संशोधकांनी तापमान व आद्र्रतेचे विश्लेषण करून पाच खंडांतील १६२ देशांची स्थिती विचारात घेतली आहे.