scorecardresearch

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत…; पंजशीर मिळवल्याच्या तालिबानच्या दाव्यावर अहमद मसूदची प्रतिक्रिया

तालिबानने पंजशीरमधील आठ जिल्हे ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत…; पंजशीर मिळवल्याच्या तालिबानच्या दाव्यावर अहमद मसूदची प्रतिक्रिया
पाकिस्तान पंजशीरच्या युद्धात सहभागी असल्याचा आरोप अहमद मसूदने केला आहे (File photo via Reuters)

काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचे तालिबानने सोमवारी सांगितले आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले, परंतु पंजशीर खोरे मात्र तालिबानविरोधी दलांच्या ताब्यात होते. पंजशीरमध्ये तालिबानविरोधी दले तालिबानी सैन्याला प्रतिकार करत होती. पण अखेर तालिबानने त्यांचा पराभव करून पंजशीरमधील आठ जिल्हे ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी पंजशीरवर नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली. मात्र तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला असला तरी अहमद मसूद यांनी तो नाकारला आहे. तालिबानविरुद्ध युद्ध चालू ठेवणार असल्याचे मसूद यांनी म्हटले आहे.

“आम्ही अजिंक्य आहोत आणि आमचे सैनिक तालिबानशी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतील. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तालिबानशी लढत राहीन,”असे अहमद मसूदने म्हटले आहे. तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केल्याच्या काही तासांनंतर अहमद मसूदचे हे वक्तव्य समोर आले आहे.

फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका ऑडिओ मेसेजमध्ये मसूदने हे वक्तव्य केलं आहे. आमचे सैन्य अजूनही पंजशीरमध्ये आहे आणि तालिबानविरुद्ध युद्ध सुरू आहे असे मसूदने म्हटले आहे. याशिवाय त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानविरुद्धच्या युद्धात एकत्र येण्याचे आवाहनही केले. तालिबानचे म्हणणे आहे की त्यांनी पंजशीर काबीज केले आहे आणि यापुढे लढाई थांबवणार नाही. तालिबानच्या म्हणण्यानुसार, अहमद मसूदने त्यांना युद्धबंदी आणि करार करण्याचा प्रस्तवा दिला होता, जो त्यांनी नाकारली आहे.

पाकिस्तान पंजशीरच्या युद्धात सहभागी असल्याचा आरोप अहमद मसूदने केला आहे. पाकिस्तान तालिबानला पंजशीरमध्ये मदत करत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय हे प्रेक्षकाप्रमाणे पाहत आहे. पाकिस्तानच्या मदतीनेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तालिबान्यांनी ठार केले. टोलो न्यूजच्या म्हणण्यानुसार अहमद मसूद म्हणाले, “पाकिस्तानला पंजशीरमध्ये सहभागी केल्याबद्दल सर्व देशांना माहिती आहे, पण ते गप्प आहेत. पाकिस्तानने थेट पंजशीरमध्ये अफगाणांवर हल्ला केला आहे.”

तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. अमेरिकेतील ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या काही दिवस आधी तालिबान्यांनी अहमद शहा मसूद यांची हत्या केली होती. त्यानंतर अहमद मसूदने तालिबानचा जोरदार प्रतिकार केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या