नवी दिल्ली : अदानी प्रकरणावरून संसदेमध्ये विरोधकांनी केंद्र सरकार व भाजपला लक्ष्य केले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपक्षीय खासदारांना कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून विरोधी पक्षांच्या आक्रमणाविरोधात तगडा संघर्ष करण्याचा सल्ला दिल्याचे समजते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची प्रथमच बैठक झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक घेण्यात आली. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये भाजप सत्तेत असून पक्ष जितका अधिक विजय मिळवेल, व्याप्ती वाढवेल तितके विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त होतील. त्यातून ते भाजपवर अधिकाधिक हल्लाबोल करतील. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोधकांशी संघर्ष करण्याची तयारी केली पाहिजे, असे मोदींनी पक्षाच्या संसद सदस्यांना सांगितले. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय संसदीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. केंद्रातील मोदी सरकारला पुढील महिन्यामध्ये ९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने १५ मे ते १५ जून या काळात खासदारांना मतदारसंघात जाऊन विविध कार्यक्रमांतून भाजपचे यश साजरे करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय, ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस असून १४ एप्रिलपर्यंत आठवडाभर सामाजिक न्याय सप्ताह साजरा केला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारख्या मोहिमांचा गुजरातमध्ये फायदा झाला असून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही याची खासदारांनी शहानिशा केली पाहिजे. पुढील महिन्यामध्ये मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १००वा भाग प्रसारित होणार असून तो अधिकाधिक लोकांनी ऐकावा यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.