नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे चढत्या महागाईचे कठीण आव्हान उभे असल्याचे चित्र मंगळवारी ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारीत किरकोळ महागाई दराच्या सात टक्क्यांच्या वेशीवर पोहोचलेल्या आकडेवारीने दाखवून दिले. दुसरीकडे देशाच्या कारखानदारीने अपेक्षित सुदृढता मिळविता आली नसल्याचे, जाहीर झालेल्या फेब्रुवारीतील अवघ्या १.७ टक्क्यांच्या औद्योगिक उत्पादनातील वृद्धी दराने दर्शविले.

सलग तिसऱ्या महिन्यांत रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील असणाऱ्या सहा टक्क्यांच्या कमाल पातळीपेक्षा किरकोळ महागाई दर अधिक राहिला असून, तो सरलेल्या मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या कडाडलेल्या किमती आणि त्यात आभाळाला पोहोचलेल्या इंधनदराची भर पडून, किरकोळ महागाई दर मार्चमध्ये १७ महिन्यांच्या उच्चांकपदाला पोहोचल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. मार्चमध्ये अन्नधान्याच्या घटकांमधील महागाई दर ७.६८ टक्क्यांवर गेला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, उत्पादन दरात महिनागणिक वाढ दिसून येत असली तरी ती वाढ अत्यंत नाममात्र आहे. मुख्यत्वे खाण उत्पादन आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनात निर्देशांकात वाढ नोंदविली गेली. फेब्रुवारीमध्ये निर्मिती क्षेत्राचे उत्पादन अवघ्या ०.८ टक्क्यांनी वधारले आहे.