Retail Inflation: महागाईनं पुन्हा RBIची निश्चित मर्यादा ओलांडली, ७.७९ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

retail inflation rate

देशात महागाईने सर्वसामान्य नागरिकांना जेरीस आणलं आहे. एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा मागील आठ वर्षातील सर्वाधिक आहे. तर खाद्य महागाई दरही ८.३८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. यापूर्वी मार्चमध्ये किरकोळ महागाई दर ६.९५ टक्के इतका होता. हा दर मागील १७ महिन्यांच्या कालावधीतील सर्वाधिक होता.

खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कमाल महागाई दराची मर्यादा ६ टक्के निश्चित केली आहे. महागाईसाठी टोलरेंस बँड २-६ टक्के ठेवण्यात आला होता. पण एप्रिलमध्ये महागाई दराने आरबीआयने निश्चित केलेली मर्यादा ओलांडली आहे. देशातील किरकोळ महागाई दर आरबीआयच्या निश्चित केलेल्या दरापेक्षा खूपच जास्त आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यापासूनमहागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नोंदला गेला आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका होता, तर जानेवारीत हा दर ६.०१ टक्के होता. कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) वर आधारित किरकोळ महागाईचा डेटा मंत्रालयाने गुरुवारी जारी केला आहे. या आकडेवारीतून देशातील महागाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

एप्रिलमधील फूड बास्केट महागाईच्या आकडेवारीतून खाद्य पदार्थांच्या किमती किती अनियंत्रित झाल्या आहेत, हे स्पष्ट होतं आहे. एप्रिलमध्ये खाद्य महागाई ८.३८ टक्के आहे. मार्च २०२२ मध्ये हा आकडा ७.६८ टक्के इतका होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हाच दर केवळ १.९६ टक्के इतका होता. खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने खाद्य महागाई दर वाढल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली मोठी घसरण आणि इंधनाच्या किमती गगनाला भीड असल्याने देशात महागाई वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Retail inflation surges to 7 point 79 percent in april highest in last 8 years latest update rmm

Next Story
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; सरकारी कार्यालयात घुसून झाडली गोळी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी