Crime News : फॉरेक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाने एका निवृत्त आर्मी कर्नलची १८.९० लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका सिंडिकेटच्या एका सदस्याला अटक केली आहे, पोलिसांनी शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की आरोपी हा २९ वर्षीय श्रीजित राजेद्रन हा एक केरळचा मच्छीमार आहे. त्याला अनेक महिन्यांच्या टेक्निकल सर्व्हेलन्स आणि तपासानंतर एका महिमेअंतर्गत कोल्लम जिल्ह्यातील अझीकल येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गु्न्हा नोंदवण्यात आला होता.
फसवणूक कशी झाली?
तक्रारीनुसार, पीडित निवृत्त कर्नल यांना डिसेंबर २०२३ मध्ये ‘क्यूट अरविन अंगिता’ नाव सांगणाऱ्या महिलेकडून मेसेज आणि फोन कॉल करण्यात आले. या फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना फॉरेक्स मार्केटमध्ये चांगल्या परताव्याची हमी देत गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. या व्यक्तीने दाखवलेला विश्वास पाहाता पीडित व्यक्तीने दीर्घ कालावधीत अनेक वेळा पैशांचे हप्ते हस्तांतरित केले. पण जेव्हा त्यांनी ही गुंतवणूक काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. या सर्व प्रकरात त्यांनी जवळपास १८.९० लाख रुपये फसवणूक करणाऱ्यांना दिले.
असा सापडला आरोपी
“तपासात असे आढळून आले की फसवणूक करून मिळवलेली रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये टाकण्यात आली. पैसे स्वीकारणारी बहुतेक खाती ही बनावट पत्ते आणि खोट्या फोननंबरवरून उघडण्यात आलेली होती. बँक खात्यांचा तपशीलाचे विश्लेषण केले असता आढळून आले की फसवणूक करून पळवलेली ५.९३ लाख रुपयांची रक्कम कोल्लम जिल्ह्यातील ओआचिरा येथील एका फेडरल बँकेच्या शाखेतील खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती, हे खाते श्रिजितशी संबंधीत होते…. ही रोख रक्कम श्रीजितने त्याच दिवशी काढून घेतली,” असे डीसीपी (गुन्हे शाखा) हर्ष इंदोरा यांनी सांगितले.
ही माहिती समोर आल्यानंतर डीसीपी इंदोरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एसीपी राज पाल दबास यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पथक केरळला रवाना झाले. पथकाने आरोपीला शोधून काढले आणि त्याला त्याच्या अझीकल येथील घरातून अटक केली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना असे आढळून आले की श्रीजात याला या रॅकेटमध्ये त्याचा एक मित्र घेऊन आला होता. त्याला फसवणुकीच्या पैशातून ऐषारामाचे आयुष्याचे अमिश दाखवण्यात आले होते.
या सिंडीकेटमधी आणखी एक सदस्य असलेला जोधपूर येथील सुनिल याला यापूर्वीच जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा कथित मास्टरमाइंड असलेला केरळच्या कोल्लम येथील आनंदू लाल हा अजूनही फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.