नवी दिल्ली ; देशाच्या संरक्षण दलांच्या यशस्वी कारवाया आणि पराक्रमांचे श्रेय घेऊन राजकीय लाभ मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून केले जात आहेत. संरक्षण दलाचा राजकीय कार्यक्रमासाठी होणारा गैरवापर सेनापती या नात्याने आपण थांबवावा, अशी विनंती करणारे पत्र निवृत्त लष्कर, हवाई आणि नौदल अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. स्वतंत्र भारतात माजी लष्कर अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे ‘सैन्याच्या राजकीयीकरणा’विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्राबाबत दावे-प्रतिदावे होत असले तरी माजी लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून पत्र तयार केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, संबंधित पत्र राष्ट्रपती भवनाला मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. या पत्राची प्रत केंद्रीय निवडणूक आयोगालाही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लष्कराला ‘मोदींची सेना’ असे म्हटले होते. त्यावर माजी लष्करप्रमुख आणि भाजपचे गाझियाबादमधील उमेदवार व्ही. के. सिंह यांनीही नाराजी व्यक्त केली होती. माजी नौदलप्रमुख अ‍ॅड. लक्ष्मीनारायण रामदास यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचा उल्लेख पत्रात केला असून ‘निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली, मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही’, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे. पत्रात योगींचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. राजकीय पक्ष निवडणूक आचारसंहितेचा बेधडक भंग करत आहेत. मतदानाचे दिवस जवळ येतील तसे आचारसंहिता न जुमानण्याचे प्रकार वाढत जातील, अशी टिपणी करण्यात आली आहे.

संरक्षण दलाच्या राजकीय गैरवापरामुळे सैनिकांचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कामगिरीवरही होऊ शकतो. पर्यायाने देशाच्या सुरक्षा आणि एकतेला बाधा पोहोचू शकते, अशी चिंता पत्रात मांडलेली आहे. पत्रावर जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज, शंकर रॉय चौधरी, दीपक कपूर, अ‍ॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, विष्णू भागवत, अरुण प्रकाश, सुरेश मेहता आणि एअर चीफ मार्शल एन. सी. सुरी या आठ माजी लष्कर, हवाई आणि नौदल प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रात काय ?

सीमेपलीकडे जाऊन लष्करी जवानांनी केलेल्या यशस्वी कारवायांचे घेतलेले श्रेय, सैन्याचा मोदीसेना असा उल्लेख, हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या फोटोचा राजकीय लाभासाठी वापर, लष्कराच्या गणवेशात पक्ष कार्यकर्त्यांची छबी झळकवणे आदी अनेक मार्गानी राजकीय पक्ष संरक्षण दलाच्या कामगिरीचा, गणवेशचा, चिन्हाचा राजकीय गैरवापर करत आहेत. भारताची संरक्षण दले धर्मनिरपेक्ष असून राजकारणापासून तटस्थ आणि निष्पक्ष राहिलेली असून ती विश्वासार्ह आणि नि:शंक राहिलेली आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

तीन अधिकाऱ्यांच्या इन्कारामुळे नवा वाद

१५६ निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले हे ऐतिहासिक पत्र वादात अडकले असून माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज, माजी हवाई दल प्रमुख एन. सी. सुरी आणि लेफ्ट. जनरल (निवृत्त) एम. एल. नायडू यांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचा इन्कार केला आहे. त्यावर अ‍ॅड. रामदास यांनी या द्वयींच्या संमतीची ई-मेल प्रत रॉड्रिग्ज आणि सुरी यांना ई-मेल करून आपण स्वाक्षरी केली होती, असे प्रत्युत्तर दिले. मेजर जनरल (निवृत्त) हर्ष कक्कड, माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी या पत्रावर स्वाक्षरी केल्याचे मान्य केले.

पत्र बनावट असल्याचाही दावा..

हे पत्र नेमके कशाबद्दल आहे याची कल्पना नाही. मी नेहमीच राजकारणापासून लांब राहिलेलो आहे. ४२ वर्षे लष्करी अधिकारी राहिल्यानंतर आता स्वत:मध्ये बदल करणेही शक्य नाही. मी नेहमीच भारताचे हित सर्वश्रेष्ठ मानले आहे. पत्र लिहिणाऱ्या व्यक्ती कोण हेही मला माहिती नाही. हे बनावट वृत्त आहे, असे माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांचे म्हणणे आहे. अ‍ॅडमिरल रामदास यांनी हे पत्र तयार केलेले नाही. कोणा मेजर चौधरी यांनी ते लिहिले असून व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलवर पाठवलेले आहे. परवानगीविनाच माझे नाव समाविष्ट केलेले आहे. या पत्रातील मजकुराशी मी सहमत नाही, असे माजी हवाई दल प्रमुख एन. सी. सुरी यांनी सांगितले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या कथित ‘बनावट वृत्ता’वर चिंता व्यक्त केली. दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी या पत्राला सहमती दिलेली नाही. शिवाय, राष्ट्रपती भवनालाही हे पत्र मिळालेले नाही. ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली.