तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अतिक्रमण विरोधी मोहिमबाबत केलेल्या एका धक्कादायक विधानामूळे देशाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणामधील अतिक्रमण विरोधी टास्क फोर्स म्हणजेच ‘हायड्रा’ ची संकल्पना आणि त्याचे नाव आपण जर्मनीचा हुकूमशाहा अॅडॅाल्फ हिटलरकडून प्रेरणा घेऊन ठेवले आहे, असा दावा रेवंत रेड्डी यांनी केला आहे. त्याच्या या वक्तव्यावर भाजपा आणि भारत राष्ट्र समिती या विरोधी पक्षांची तीव्र आक्षेप घेतला असून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले रेवंत रेड्डी?
बेंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, “‘हायड्रा’ हा शब्द हिटलरचा अत्यंत आवडता शब्द होता. हिटलरच्या कोअर टीमला ‘हायड्रा’ म्हटले जायचे, जे कोणाचीही हत्या करू शकत होते. तिथूनच प्रेरणा घेऊन मी या टास्क फोर्सचे नाव ‘हायड्रा’ ठेवले आहे.”
दरम्यान, इतिहासतज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांचा हा दावा तातडीने फेटाळून लावला आहे. हिटलरच्या कोणत्याही गुप्त पथकाचे नाव ‘हायड्रा’ नव्हते, उलट दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने नाझी जर्मनीविरुद्ध राबवलेल्या एका बॉम्बहल्ला मोहिमेचे नाव ‘हायड्रा’ होते, असे स्पष्टीकरण तज्ज्ञांनी दिले आहे.
भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
रेवंत रेड्डी यांच्या या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “काँग्रेसची हुकूमशाही आणि आणीबाणीची मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे,” अशी टीका पूनावाला यांनी केली.
ट्विटरवर (X) पोस्ट करत पूनावाला म्हणाले, “रेवंत रेड्डी आता उघडपणे सांगत आहेत की त्यांना ‘हायड्रा’ तयार करण्यासाठी हिटलरकडून प्रेरणा मिळाली. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ते रेवंत रेड्डी यांच्या पत्रकार आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईपर्यंत, काँग्रेसची हीच खरी हुकूमशाही मानसिकता आहे. राहुल गांधी आता त्यांच्या या मुख्यमंत्र्यांवर काय कारवाई करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उत्तर-दक्षिण वादावरूनही घेरले
याच कार्यक्रमात रेवंत रेड्डी यांनी केलेल्या एका प्रादेशिक विधानावरूनही वाद पेटला आहे. “राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे उत्तर भारतातील आहेत. आम्ही फक्त कर भरायचा आणि दिल्लीला मुजरा करायचा, अशा दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून आम्हाला जगायचे नाही,” असे रेड्डी म्हणाले होते.
यावर उत्तर देताना पूनावाला यांनी, काँग्रेस देशात ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ अशी दरी निर्माण करून देश तोडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधान गुजरातचे आहेत, तर देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ओडिशाच्या आहेत. असे असतानाही रेवंत रेड्डी जिन्ना यांच्या विचारसरणीप्रमाणे देशाचे तुकडे करू पाहत आहेत,” अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
