गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे. इतकंच नाही तर देशभरातल्या विविध सार्वजनिक ठिकाणी गणेशाचं आगमन झालं आहे. दरम्यान तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी असलेली एक गणेश मूर्ती चर्चेत आली आहे. यामागचं कारणही तसंच आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याच्या खांद्यावर ही गणेश मूर्ती विराजमान दाखवण्यात आली आहे.

गणेश मूर्तीची हैदराबादमध्ये चर्चा

रेवंथ रेड्डी यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर विराजमान गणेश मूर्तीची चर्चा हैदराबाद मध्ये रंगली आहे. काँग्रेस नेते मेत्तू साई कुमार यांनी गणेश उत्सव साजरा करताना प्रजा पालन ही थीम घेतली आहे. त्यात रेवंथ रेड्डी सरकारने मागील १ हजार दिवसांत केलेली कामं दाखवली आहेत. एवढंच नाही तर तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहितीही या ठिकाणी देखावा म्हणून दाखवण्यात आली आहे. याच मंडळात मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा पुतळा उभारून त्यांच्या खांद्यावर गणपती विराजमान झाला आहे असं दाखवण्यात आलं आहे. या मूर्तीने लक्ष वेधलं आहे. या मूर्तीची चर्चा हैदराबादसह तेलंगणामध्ये रंगली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

२०२५ चा वाद काय?

मेत्तू साई कुमार यांनी गणेश उत्सवात जी मूर्ती बसवली आहे ती रेवंथ रेड्डींच्या पुतळ्याच्या खांद्यावर विराजमान आहे. त्यामुळे या उत्सवाला स्थानिक राजकारणाचा रंग आला आहे. त्यामुळे इतर पारंपारिक मंडळं यावर आक्षेप घेण्याची चिन्हं आणि या मूर्तीमुळे वाद रंगण्याची चिन्हं आहेत. साई कुमार यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने मूर्ती बसवली आहे असं नाही. याआधीही त्यांनी रेवंथ रेड्डींची थीम वापरून गणेश उत्सव साजरा केला आहे. २०२५ मधल्या गणेशोत्सवात त्यावरुन वादही झाल्याचं पाहण्यास मिळालं होतं. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता. आता यावर्षी पुन्हा एकदा अशीच एक थीम करण्यात आली आहे.

भाजपा नेते काय म्हणाले होते?

दरम्यान मागील वर्षी भाजपाचे आमदार टी राजा सिंग यांनी या मूर्तीला आक्षेप घेतला होता आणि या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावं अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात लक्ष घालत मूर्ती बदलून साधी मूर्ती आणा हे सांगितलं होतं. ज्यानंतर साधी मूर्ती बसवण्यात आली होती. आमच्या धार्मिक भावना दुखावू नका असं राजा यांनी म्हटलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला होता.