तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या वक्तव्याने राज्यात वादंग निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी उत्तर आणि दक्षिणेतील राजकीय आणि धार्मिक विचारधारेची तुलना केली आहे. रेड्डी यांच्या या वक्तव्यावर भाजपाने जोरदार टीका करत, निषेध नोंदवला आहे. राजकीय फायद्यासाठी रेड्डी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राजधानी दिल्लीत एका माध्यमाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी रेड्डी यांनी भाजपा नेते “जय श्री राम”ची घोषणा देतात तशी “हर हर महादेव”ची घोषणा का देत नाहीत? असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत उपस्थित केला. “आम्ही द्रविड आहोत, ते आर्य आहेत. आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, तर ते भगवान रामाचे भक्त आहेत,” असे रेड्डी म्हणाले. रेड्डी यांनी “प्रभू राम श्रीमंतांचा” तर “भगवान शिव गरीबांचा” देव असल्याचा उल्लेख यावेळी केला.
रेड्डींचे सवाल
उत्तर आणि दक्षिण भारताच्या राजकीय संस्कृतीत फरक असल्याचेही रेड्डी यांनी यावेळी नमूद केले. तसेच, कार्यक्रमात यावर सविस्तर भाष्यही केले. रेड्डी यांनी मतदारसंघ फेररचना मुद्यावरुन चिंता व्यक्त केली. लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवणे यामुळे दक्षिणेतील राजकीय बळावर परिणाम करणारे ठरेल, असेही रेड्डी म्हणाले. रेड्डी यांच्या वक्तव्यावर भाजपाने जोरदार टीका केली. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी रेड्डी यांच्यावर प्रभू राम आणि भगवान शिवाच्या नावाने फूट पाडण्याचा आरोप केला.
भाजपाची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काशी विश्वनाथ मंदिराबाबत असलेली श्रद्धा अधोरेखित केली. तसेच, भाजपा महादेवाची पूजा करत नाहीत या दावा खोडून काढण्यासाठी मोदींनी वेमुलावाडा येथे दिलेल्या भेटीचा उल्लेख केला. रेवंथ रेड्डी अगोदर मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुस्लिम असे म्हणत होते ते आता प्रभू राम आणि महादेव यांच्या रेषा ओढू पाहत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कल्पना हवी की वेमुलावाडा येथे दक्षिण काशी आहे आणि भद्राचेलम येथे दक्षिण आयोध्या. त्यांनी महादेव आणि रामाच्या नावाने फूट पाडू नये, असे कुमार म्हणाले. काँग्रेस राजकीय फायद्यासाठी असे करत असल्याचे आरोप करत रेड्डींनी हिंदू धार्मिक भावना व प्रथांचे प्रादेशिक विभाजन करु नये असेही मत मांडले.
