scorecardresearch

Premium

काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, उपमुख्यमंत्री पदाची धुरा भट्टी विक्रमारकांकडे!

हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ५

revanth Reddy
रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री (फोटो – काँग्रेस / एक्स)

Revanth Reddy New CM Of Telangana : विधानसभा निवडणुकीत सत्तांतर घडून आलेल्या तेलंगणात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचाही कार्यक्रम पार पडला आहे. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, भट्टी विक्रमारका यांनी उपमुख्मयंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शासकीय कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते.

हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदासाठी रेवंथ रेड्डी यांच्या नावाची काँग्रेसकडून औपचारिक घोषणा झाली होती. हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तिथे सर्वानुमते रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं.

Shiv Sainik Manohar Joshi passed away Mumbai
बाळासाहेबांचा विश्वास लाभलेला शिवसैनिक; नगरसेवक, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष..
ram mandir congress
उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?
murder of Ghosalkar
“घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी”, वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी…”
karnataka Chief Minister Siddaramaiah
कर्नाटक अन् केरळवरील अन्यायाच्या आरोपातून काँग्रेसचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन, भाजपच्या खासदारांनाही सहभागी होण्याची विनंती

अभाविप, तेलुगू देशम, भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस, असा राजकीय प्रवास करणारे रेवंत रेड्डी यांना तेलंगणाच्या मुख्यंत्रीपदाची खुर्ची देण्यात आली आहे. पक्षांतर्गत विरोध असतानाही पक्षाने रेड्डी यांना संधी दिली आहे. यामुळेच पक्षात एकवाक्यता राखण्याचे मोठे आव्हान रेड्डी यांच्यासमोर असणार आहे.

हेही वाचा >> ‘केसीआर’ यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा

पंतप्रधानांनाकडून शुभेच्छा

तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन. तेलंगण राज्याच्या आणि राज्यातील नागरिकांच्या विकासासाठी आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी एक्सवर केली.

तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी ११९ जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या. त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागला. या निकालात गेल्या १० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या बीआरएस पक्षाचा काँग्रेसचे धोबीपछाड केला. २०१८ च्या निवडणुकीत अवघ्या १९ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसने तब्बल ६६ जागांवर मजल मारली. तर, २०१८च्या निवडणुकीत ८७ जागा मिळवणाऱ्या बीआरएसने निम्म्यापेक्षा जास्त जागा गमावल्या असून त्यांची ३९ जागांवर घसरण झाली. दुसरीकडे, भाजपने आपल्या २०१८च्या कामगिरीमध्ये सुधारणा केली आहे. भाजपने आठ जागेवर विजय मिळवला. भाजपच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाली.

हेही वाचा >> अभाविप ते काँग्रेस प्रवास करणारे रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

कोण आहेत रेवंत रेड्डी?

महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे जन्मलेले ५४ वर्षीय रेवंत यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी असे आहे. उस्मानिया विद्यापीठातून पदवी मिळवताना त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून महाविद्यालयीन राजकारणात पाऊल ठेवले. २००६ साली त्यांनी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष निवडणूक लढविली आणि ती जिंकलीही. पुढच्याच वर्षी २००७ साली आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले. आंध्र प्रदेश विधान परिषदेत काम करताना तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रेड्डी यांच्यातले नेतृत्वगुण हेरून त्यांच्यासमोर टीडीपीमध्ये काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. २००९ साली रेड्डी यांनी टीडीपीच्या तिकिटावर कोंडगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे मातब्बर आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला.

रेवंत रेड्डी हे २०१४ मध्ये पुन्हा आमदार झाले. तसेच त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी बिनसले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१८ साली त्यांनी कोंडगल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली; मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१९ साली काँग्रेसने त्यांना मल्काजगिरी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (आता भारत राष्ट्र समिती) उमेदवाराचा पराभव करीत पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला. २०२१ साली ते तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष झाले. त्यानंतर त्यांनी तेलंगणात काँग्रेस पक्षसंघटना मजबूत केली. तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात रेवंत रेड्डी यांचा मोठा वाटा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Revanth reddy takes oth as chief minister of telangana in the presence of sonia gandhi and rahul gandhi sgk

First published on: 07-12-2023 at 14:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×