कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात आता दोन वर्षांनंतर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर डॉक्टरच्या मृतदेहावर कथितरीत्या घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांना गुरुवारी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत डॉक्टरच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
पीडित डॉक्टरच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित असताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस आयुक्तांना या कथित घाईघाईने केलेल्या अंत्यसंस्काराच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच दुसऱ्या शवविच्छेदनाची शक्यता टाळण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घाईने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला होता.
दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हा गुन्हा बलात्कार आणि हत्येप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआयच्या तपासापेक्षा वेगळा आहे. सीबीआय आर.जी.कर हॉस्पिटलमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. जे कोलकाता पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येतं. मात्र, खारदाह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नवीन एफआयआर हा मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या तक्रारींवर आधारित आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की पुरावे दडपण्यासाठी त्यांच्या संमतीशिवाय मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
नेमकं घटना काय घडली होती?
९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका कनिष्ठ महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती आणि न्यायासाठी देशभरात तीव्र निदर्शने झाली होती.
या प्रकरणात सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी संजय रॉय याला अटक केली होती. मात्र, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने नंतर हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. २० जानेवारी २०२५ रोजी विशेष न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला होता. तसेच देशभरातून याचा निषेध करण्यात आला होता. इतकेच नाही तर देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
