मध्य प्रदेशातील ‘राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय’ (RGPV) या प्रसिद्ध विद्यापीठातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिटे चोरीला गेल्यामुळे विद्यापीठाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा तडकाफडकी रद्द करावी लागली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
RGPV विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’ विभागाच्या दुसऱ्या वर्षातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर विषयाची परीक्षा शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका गायब असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनाला आले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने परीक्षा केंद्राची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि प्रश्नपत्रिका असलेली ९ सीलबंद पाकिटे चोरून नेली. सकाळी जेव्हा प्रशासकीय अधिकारी केंद्रावर पोहोचले, तेव्हा त्यांना खिडकी तुटलेली आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
कुलगुरूंनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस
या गंभीर प्रकारानंतर विद्यापीठाचे कुलगुरू आलोक शर्मा यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी’च्या संचालिका अर्चना तिवारी आणि पदव्युत्तर परीक्षा नियंत्रक यांना स्वतंत्रपणे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
“परीक्षा नियंत्रक म्हणून प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि सुरक्षा राखणे ही तुमची जबाबदारी होती. या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत,” अशा शब्दांत कुलगुरूंनी नाराजी व्यक्त करत ३ दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यापीठाची बदनामी करण्याचा डाव?
कुलगुरू आलोक शर्मा यांनी या घटनेला अत्यंत गंभीर मानले असून, हा विद्यापीठ आणि मध्य प्रदेश राज्याला बदनाम करण्याचा एक पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. विद्यापीठाचा द्वेष करणाऱ्या घटकांचेच हे काम असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एक विशेष समिती स्थापन करण्यात येत आहे.
या चोरीप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून चोरट्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, रद्द झालेली ही परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली असून, लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे गोपनीय परीक्षा साहित्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
