तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत विजय जोसेफ नावाच्या नेत्याने मैदान मारत १०५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. डीएमके आणि एआयडीएमके या दोन पक्षांच्या भोवती तामिळनाडूचं राजकारण मागची ५० वर्षे फिरत होतं. अशातच विजयने मोठा विजय संपादन करत इतिहास घडवला आहे. विजय जोसेफची चर्चा फक्त तामिळनाडूतच नाही तर संपूर्ण देशात रंगली आहे. अशातच विजयचा एक फटो व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. करुणानिधींकडे एक टक पाहणारा विजय या फोटोत दिसतो आहे.

विजयबाबत राम गोपाल वर्मा काय म्हणाले?

राम गोपाल वर्मांनी एक खास पोस्ट विजयसाठी लिहिली आहे. “एम करुणानिधी यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की त्यांच्यामागे उभा असलेला मुलगा त्यांचा पक्ष एक दिवस संपवेल.” राम गोपाल वर्मांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी आपल्या या पोस्टसह एम करुणानिधी आणि विजय यांचा एक फोटो पोस्ट केला आहे.

फोटोमध्ये काय दिसतं आहे?

असं म्हणतात की एक फोटो एक हजार शब्दांचं काम करतो. तमिळनाडूच्या राजकीय इतिहासतला हा फोटोही तसाच ठरला आहे.या फोटोमध्ये एम करुणानिधी हे एका कार्यक्रमाचं उद्घाटन करताना फित कापत आहेत. त्यांच्यासह इतर सहकारीही आहेत. पण त्यांच्या मागे एक मुलगा उभा आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कुणीही नसून विजय जोसेफ आहे. विजयच्या किशोर वयातला हा फोटो आहे. तामिळनाडू्च्या मुख्यमंत्रिपदावर एम करुणानिधी होते, त्यावेळी त्यांना हे कधीही वाटलं नसेल की हा फोटोत आपल्यामागे असलेला मुलगा एक दिवस आपला पक्ष संपवून टाकेल. पण एखाद्या सिनेमात दाखवतात तशीच या फोटोची कहाणी ठरली आहे. विजयने आपला करीश्मा दाखवत १०५ हून अधिक जागा २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या आहेत. विजयने आपल्या टीव्हीके पक्षाच्या जागा जिंकून आणत तमिळनाडूच्या पाच दशकांच्या राजकारणाला छेद देत त्याच्या रुपाने आणि टीव्हीकेच्या रुपाने नवा पर्याय दिला आहे.

Thalapathy Vijay
भाजपाप्रणीत आघाडीशी हातमिळवणी न करण्याचे विजयने फार आधीच दिले होते संकेत, Video व्हायरल!, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

राम गोपाल वर्मांचं ट्वीट व्हायरल

राम गोपाल वर्मांनी विजयबाबत केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. विजयच्या टीव्हीके या पक्षाने तमिळनाडूत १०८ जागा जिंकल्या आहेत. ४ मे रोजी जो निकाल लागला त्या निकालांमध्ये तमिळनाडूत विजयचा टीव्हीके हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तमिळनाडूचं राजकारण हे डीएमके आणि एआयडीएके या दोन पक्षांभोवती मागच्या पाच दशकांपासून फिरत होतं. मात्र विजय आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं अशी स्थिती तमिळनाडूत आहे. एम. करुणानिधी यांचा मुलगा म्हणजे एम. के. स्टॅलिन. त्यांनाही त्यांची जागा वाचवता आलेली नाही. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. विजयचा उदय हा तमिळनाडूच्या नव्या विकासाची नांदी ठरणारा आहे यात शंका नाही.

स्टॅलिन यांना मिळालं नाही अपेक्षित यश

एम करुणानिधी हे तमिळनाडूचे प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री होते. तसंच १९६९ मध्ये करुणानिधी हे पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१८पर्यंत ते यापदावर कायम होते. २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. राजकारणात येण्यापूर्वी एम करुणानिधी यांनी तमिळ चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा तमिळनाडूमध्ये उंचावलेली होती. विविध दशकांमधे करुणानिधी हे तमिळनाडूचे नऊवेळा मुख्यमंत्री होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर एम. के. स्टॅलिन हे पक्षाचे अध्यक्ष झाले. २०२१ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तम यश मिळवलं. त्याच वर्षी स्टॅलिन मुख्यमंत्रीही झाले. मात्र २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळवता आलं नाही.

Thalapathy Vijay TVK victory Tamil Nadu | Tamil Nadu Assembly Election Results 2026 | थलपती विजय टीव्हीके विजय तामिळनाडू | तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकाल विजय
थलपती विजय आणि टीव्हीके पक्षाचा तामिळनाडूत ऐतिहासिक विजय

विजयच्या वडिलांनी या ऐतिहासिक फोटोबाबत काय सांगितलं?

विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तमिळ सिनेसृष्टीत दिग्दर्शक आणि निर्माते होते. सिनेसृष्टीतल्या एका कार्यक्रमात एम. करुणानिधी प्रमुख पाहुणे होते. त्या कार्यक्रमातलाचा फोटो व्हायरल झाला आहे. याबाबत चंद्रशेखर म्हणाले, विजय सिनेसृष्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यामुळे तो त्या फोटोमध्ये एम. करुणानिधी यांच्या मागे उभा आहे हे दिसतं आहे. करुणानिधी हे आधी लेखक होते, सिनेसृष्टीशीही त्यांचा संबंध होता, त्यामुळे सिनेसृष्टीतल्या कार्यक्रमांना ते येत असत. अशाच एका कार्यक्रमातला हा फोटो आहे ज्यात विजय करुणानिधींच्या मागे उभा आहे असं दिसतं आहे अशी आठवण विजयच्या वडिलांनी सांगितली. The Screen ने वृत्त दिलं आहे.

रजनीकांत-कमल हासन यांना जे जमलं नाही ते विजयने करुन दाखवलं

२५ वर्षांपासून सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, रजनीकांत यांची लोकप्रियता आणि त्यांचा चाहतावर्ग टीव्हीकेचे प्रमुख विजय यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. मात्र, प्रकृतीचे आणि कोरोना महामारीचा कारण देत रजनीकांत यांनी एकही निवडणूक न लढवता २०२० मध्ये राजकारणातून माघार घेतली. कमल हासन यांचा राजकीय पक्ष ‘मक्कल नीथी मय्यम’ (MNM) या पक्षाची २०१९ आणि २०२१ मध्ये चांगलीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या पक्षाचा प्रभाव काही शहरी भागांपुरता आणि बुद्धिजीवी मतदारांपुरताच मर्यादित राहिला. २०२६ मध्ये कमल हासन अधिकृतपणे या शर्यतीतून कधीचेच बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वतः ही निवडणूक लढवण्याऐवजी डीएमके आघाडीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटसृष्टीतून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या नेत्यांपेक्षा विजयने वेगळी स्टॅटर्जी वापरल्याचे दिसून येते. रजनीकांत यांच्याप्रमाणे विजयने राजकारणात प्रवेश करण्यास अनाठाई वेळ लावला नाही. २०२४ मध्ये टीव्हीके स्थापना केल्यानंतर, विजयने तळागाळात संघटन वाढवण्यावर भर देण्यासाठी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर आपली सर्व शक्ती ही २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी झोकून दिली. २०२६ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा अत्यंत धाडसी आणि जोखमीचा निर्णय विजयने घेतला आणि रजनीकांत, कमल हासन यांना जे जमलं नाही ते करुन दाखवलं.